मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) प्राधिकरणाने येथील सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानुसार, आजवर १३,४०० रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यात पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरणात प्रत्यक्षात विस्थापित होणाऱ्या १,६८४ रहिवाशांचा समावेश आहे. या रहिवाशांची पात्रता निश्चितीची प्रारूप यादी आठवड्याभरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रसिद्ध करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) घाटकोपर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणात रमाबाई आंबेडकर नगरातील काही घरे बाधित होणार आहेत. या घरांसह संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरातील १६ हजारांहून अधिक झोपड्यांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीए आणि ‘झोपु’प्राधिकरण यांच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात ‘झोपु’प्राधिकरणाने मार्चमध्ये सर्वेक्षण सुरू केले. तर महिनाभरात १३,४०० रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा – परिवहन विभागात घोटाळा, ‘अंधेरी आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे १०० हून अधिक वाहनांची नोंदणी

पात्रता निश्चिती प्रक्रिया

– आठवडाभरात पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणातील प्रत्यक्ष विस्थापित होणाऱ्या १,६८४ झोपड्यातील रहिवाशांच्या पात्रता निश्चितीची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर सूचना-हरकती मागवून त्यावर सुनावणी घेतली जाईल. त्यानंतर या रहिवाशांचे परिशिष्ट-२ अर्थात अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध केली जाईल.

– रमाबाई आंबेडकर नगरातील उर्वरित रहिवाशांची पात्रता निश्चित करून त्यांचे परिशिष्ट २ प्रसिद्ध केले जाईल. पात्रता निश्चिती पूर्ण झाल्यास घरे रिकामी करून बांधकामे पाडली जातील. त्यानंतर ‘झोपु’ प्राधिकरण ‘एमएमआरडीए’ला भूखंड मोकळा करून देईल.

हेही वाचा – वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा

पुनर्विकास

एकूण झोपड्या – १६,५७५

झोपड्यांचे सर्वेक्षण – १२,४००

झोपड्यांचे सर्वेक्षण शिल्लक – २,५००

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ramabai ambedkar nagar redevelopment survey of 13400 residents completed mumbai print news ssb