मुंबई : अश्लील छायाचित्राद्वारे धमकावून २७ वर्षीय तरुणीकडे खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी अखेर अटक केली. आरोपीने पीडित मुलीच्या नातेवाईकाला छायाचित्र पाठवून तिची बदनामीही केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडित मुलगी चार वर्षांपूर्वी लोअर परळ परिसरात कामाला होती. त्यावेळी आरोपी तरूण तिच्या कार्यालयात पर्यवेक्षक पदावर कामाला होता. तेथे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर २०२२ मध्ये आरोपीने पीडित मुलीला त्याच्या वाढदिवसानिमित्त अंधेरी मरोळ येथील हॉटेलमध्ये बोलवले होते. तेथे पीडित मुलीला बोलवल्यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी पीडित मुलीचे अश्लील छायाचित्र काढले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला धमकावण्यास सुरूवात केली. वारंवार धमक्यांमुळे पीडित मुलगी तणावाखाली होती. आरोपीने १३ फेब्रुवारी २०२५ ला पीडित तरूणीकडे ७० हजार रुपयांची मागणी केली. पण पीडित मुलीने रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने पीडित मुलीची बदनामी करण्याची उद्देशाने तिचे अश्लील छायाचित्र बहिणीला पाठवले. बहिणीकडून हा प्रकार कळल्यानंतर पीडित मुलीने आरोपीविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने घाटकोपर पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३०८(३), ३५१(३), ३५२, ६४ अंतर्गत वियनभंग व खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घाटकोपर पोलिसांनी तात्काळ पोलीस पथक तयार करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पण पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार अंधेरी मरोळ येथील हॉटेलमध्ये झाल्यामुळे हे प्रकरण एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. एमआयडीसी पोलिसांना आरोपीचा ताबाही देण्यात आला. त्यानंतर एआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून तक्रारीनुसार विविध ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय पीडित मुलीच्या नातेवाईकाला आरोपीने पीडित मुलीचे अश्लील छायाचित्र पाठवले होते. याप्रकरणात तो महत्त्वाचा पुरावा आहे. याप्रकरणात आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. आरोपीचा गुन्हेगारी पूर्व इतिहास तपासला असता त्याच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले याप्रकरणी एआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.