मुंबई: सहा महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने जवळच राहणाऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपीने पलायन केले. तो विविध राज्यांमध्ये फिरत होता. अखेर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली. पीडित महिला मुलासह राहत होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने सहा महिन्यांपूर्वी तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. त्यानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी पळून गेला.
हेही वाचा : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात आता पोलीस अधिकारी
महिलेने याबाबत पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. याचदरम्यान आरोपी उत्तर प्रदेश येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक निरीक्षक दीपक साळुंखे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ उत्तर प्रदेश गाठले. मात्र आरोपीला याची माहिती मिळताच तो राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश येथे ठावठिकाणा बदलून राहात होता. तो पिलीभित जिह्यातील मोहनपूर या गावात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे पोहोचून पोलिसांनी तत्काळ त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक माहिती घेत आहेत.