मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर कारवाई करत अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईमुळे बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आहे. याचं कारण म्हणजे ताब्यात घेतलेल्यांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. आर्यन खानचा जवळचा मित्र अरबाज मर्चंटदेखील यावेळी उपस्थित होता. या सर्वांची सध्या एनसीबी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.
“…म्हणून मी रेव्ह पार्टीत हजर होतो”, आर्यन खानची एनसीबी अधिकाऱ्यांना माहिती
कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. समीर वानखेडे यांनी एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी चौकशी सुरु असलेल्यांची नावं जाहीर केली असून आर्यन खानच्या नावाला दुजोरा दिला आहे.
समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण आठ जणांची चौकशी केली जात आहे. “आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रम छोकेर, गोमित चोप्रा यांची क्रूझ पार्टी रेव्ह प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. अरबाज मर्चंट हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जवळचा मित्र आहे.
दरम्यान एनसीबीचे प्रमुख एस एन प्रधान यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवडे सुरु असलेल्या तपासाचा हा निकाल आहे. आम्हाला गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली असताना बॉलिवूड लिंक समोर आली असल्याचं ते म्हणाले आहेत.
एनसीबीने मिळवले आर्यनचे क्रूझवरील व्हिडीओ
एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचे क्रूझवरील व्हिडीओ मिळवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओंमध्ये आर्यन खान सफेद टी-शर्ट, लाल शर्ट, निळी जीन्स आणि टोपीत दिसत आहे.
आर्यनचा मोबाइल जप्त, चॅट्सची तपासणी
एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानचा मोबाइल फोन जप्त केला असून त्यामधील चॅट्स आणि टेक्स्ट मेसेजेची तपासणी केली जात आहे. याशिवाय ताब्यात घेतलेल्या इतरांचेही मोबाइल तपासले जात आहेत.
दिल्लीमधील उद्योगपतीच्या तीन मुली ताब्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, क्रूज पार्टीसाठी दिल्लीहून आलेल्या तीन मुलींनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. दिल्लीतील एका नामवंत उद्योगपतीच्या या मुली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
एनसीबीकडून आयोजकांना समन्स
एनसीबीने पार्टी आयोजकांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. एफटीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक काशीफ खानदेखील रडारवर असून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. ही पार्टी आयोजित करण्यात त्यांचा हात असल्याची सूत्रांची माहिती आहे.