*  ७५ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण
*  पावसाळ्यासाठी तयार असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा
मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. मलेरिया, डेंग्यू आणि पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. नालेसफाईची ७५ टक्के कामे पूर्ण झाली असून खड्डे भरण्याचे काम पालिका कर्मचारी करीत आहेत, असा दावा पालिकेने केला आहे.
पावसाळापूर्व नालेसफाईची ७५ टक्के कामे पूर्ण झाली असून मिठीसह ओशिवरा, पोयसर, दहिसर, वाकोला या नद्यांच्या सफाईचे काम प्रगतिपथावर आहे. रेल्वेच्या हद्दीतील सपाईसाठी पालिकेने रेल्वेला ४ कोटी ५१ लाख रुपये दिले असून सफाईचे काम वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वेकडून व्यक्त करण्यात आला
आहे.
मिठीच्या १७.८ कि.मी. लांबीपैकी १.२८ कि.मी. लांबीच्या नदीची सफाई एमएमआरडीए करीत असून उर्वरित नदीची सफाई पालिकेमार्फत केली जात आहे. तसेच शहर व उपनगरांतील १८,७५० वृक्षांची छाटणी करण्यात आली असून धोकादायक बनलेले ७११ मृत वृक्ष पाडण्यात आले आहेत.
पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्यास स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे
साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. मलेरिया, डेंग्युचा डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी ‘मुंबई पंचसूत्री’ची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. सर्व रुग्णालयांमध्ये जलजन्य आजाराने बाधित रुग्णांसाठी ३,१७७ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून झोपडपट्टय़ांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. कस्तुरबा रुग्णालयात साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर ८८ जीवरक्षक, तसेच अग्निशमन दलाची सहा पूर बचाव पथके, नागरी संरक्षण दलाचे ३०० स्वयंसेवक समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्यात येणार आहेत. सुमारे ९५९ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने तेथील रहिवाशांना नोटिसा देण्यात आल्या असून महापालिकेच्या १५० शाळांमध्ये त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सीताराम कुंटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आपत्कालीन सेवेसाठी
आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी क्रमांक १०८ आणि १९१९ वर संपर्क साधावा, असे आवाहन पालिका आयुक्त कुंटे यांनी केले. पावसाळ्यात हवामानाचा अंदाज घेण्यासाठी mumbaimonsoon.com  ही बेवसाईट ५ जूनपासून कार्यान्वित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader