मुंबई शहर आणि उपनगरांत जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. मात्र, जुलैच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा मुंबईत मुक्काम कायम आहे. परिणामी, १ ते १५ जुलै या कालावधीत मुंबई उपनगर आणि शहरामध्ये सरासरीपेक्षा अनुक्रमे १५५ टक्के व ९४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.
जूनमध्ये पावसाने ओढ घेतल्यामुळे पावसाच्या सरासरी प्रमाणात ३१ टक्के तूट नोंदली गेली. जुलैच्या सुरुवातीपासूनच पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही तूट भरून निघाली. १ जून ते १५ जुलै या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा ४६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. या कालावधीत राज्यात सामान्यपणे ३६०.८ मि.मी. पाऊस पडतो. मात्र यंदा ५२७.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. याच कालावधीत मुंबई उपनगर आणि शहरात सरासरीपेक्षा अनुक्रमे ४३ टक्के व १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरांत सामान्यपणे ९६३.८ मि.मी. पाऊस पडतो. तर, यंदा १ हजार ३७८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. मुंबई शहरात सामान्यपणे ९२७.४ मि.मी. पाऊस पडतो. यंदा १,०७३.४ मि.मी. पावसाची नोंद झाली.
दरवर्षी १ जुलै ते १५ जुलै या काळात मुंबई उपनगर आणि शहरात साधारणत: अनुक्रमे ४२६.७ मि.मी., ३८५.१ मि.मी. पाऊस पडतो. मात्र यंदा अनुक्रमे १०८६.६ मिमी आणि ७४८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी सकाळी साडेआठवाजेपर्यंत (मागील २४ तासांत) घाट भागातील पावसाच्या नोंदी
लोणावळा २०२ मि.मी.
शिरगाव १९६ मि.मी.
आंबोने २२२ मि.मी.
दावडी २२२ मि.मी.
धुंगेरवाडी १७५ मि.मी.
खेड २१३ मि.मी.
भिरा १०० मि.मी.