मुंबई : उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाड्यामुळे होणारी काहिली बुधवारीही कायम राहणार आहे. मुंबईत गेल्या आठ वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. याचबरोबर मंगळवारी राज्यातील सर्वाधिक तापमान सांताक्रूझ येथे नोंदले गेले. सांताक्रूझ केंद्र येथे मंगळवारी ३८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

मुंबईत गेल्या आठ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद मंगळवारी झाली. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात मंगळवारी ३८.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यापूर्वी १९ फेब्रुवारी २०१७ रोजी ३८.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ३.६ अंशानी अधिक होते.

सांताक्रूझ केंद्रातील तापमानही सरासरीपेक्षा ५.९ अंशांनी अधिक होते. राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमान सांताक्रूझ येथे नोंदले गेले. त्याखालोखाल ठाणे, रत्नागिरी, पालघर केंद्रातही सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह, ठाणे, रायगड येथे उष्णतेची लाट बुधवारीही कायम असेल, त्याची तीव्रताही अधिक असेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. या कालावधीत कमाल तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तसेच कोकणातील काही भागात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली. त्यानंतर पुढील दोन – तीन दिवसांनंतर तापमानात काही अंशांनी घट होईल, असेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, बुधवारीही उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक तप्त दिवस (कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

२८ फेब्रुवारी २०२० – ३८.४

१९ फेब्रुवारी २०१७- ३८.८

२३ फेब्रुवारी २०१५- ३८.८

२२ फेब्रुवारी २०१२- ३९.१

मुंबईतील फेब्रुवारीमधील विक्रमी तापमानाची नोंद

२५ फेब्रवारी १९६६- ३९.६ अंश सेल्सिअस

उष्णतेची लाट कधी येते

सामान्यत: सलग दोन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने अधिक असते त्या दिवशी उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते. मार्च ते मे महिन्यात देशाच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटांची शक्यता असते. सध्या मुंबई, तसेच कोकणात पूर्वेकडून जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर या भागात हवा अधिक तप्त होत आहे. मागील काही दिवसांत मुंबईतील तसेत कोकणातील अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ अंश सेल्सिअसने वाढले आहे.

Story img Loader