मुंबई : मुंबईमध्ये मंगळवारी एकही नवीन करोना रुग्णाची नोंद झाली नाही. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असताना मुंबईमध्ये तब्बल ३४ महिन्यांनंतर २४ जानेवारी २०२३ रोजी करोना रुग्णांची शून्य नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतून करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपुष्टात येत असून, मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईमध्ये करोना रुग्णांचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये सापडला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत करोना रुग्णांच्या संख्येने पाच अंकी संख्या गाठली तर हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर आलेल्या तीन लाटांमध्येही रुग्णांवर योग्य उपचार करून साथ रोखण्यात यश आले. परिणामी मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात असून, २४ जानेवारी २०२३ रोजी मुंबईमध्ये करोना रुग्णांची शून्य नोंद झाली. मुंबईत १६ मार्च २०२० रोजी करोनाबाधित रुग्णसंख्या शून्य होती. त्यानंतर तब्बल ३४ महिन्यांनंतर करोनाबाधित रुग्णांची शून्य नोंद करण्यात आली आहे.
मुंबईतील आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार २४० इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या १९ हजार ७४७ वर स्थिरावली आहे. दिवसभरात ८ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ११ लाख ३५ हजार ४७० रुग्णांनी करोनाला हरवले आहे.