मुंबई : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ३६ अंश सेस्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात मंगळवारी सकाळपासून उष्ण वारे जाणवत होते. उष्ण वाऱ्यांमुळे तप्त झळा नागरिकांना सहन कराव्या लागत होत्या. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाडा आणि उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागेल.

मागील काही दिवस मुंबईत कमाल तापमानात घट झाली होती. साधारण ३२ ते ३३ अंशादरम्यान तापमान नोंदले जात होते. मात्र, सोमवारपासून मुंबईच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४. १ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षाही अधिक नोंदले गेले. यंदा पूर्वानुमानानुसार एप्रिल महिन्यात तापमान सरासरीहून अधिक असेल असा अंदाज हवामान विभागाने याआधीच व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेत सातत्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवेची द्रोणीय स्थिती तयार होत आहे. यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. तापमानातील ही वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. उकाडा आणि उन्हाचा ताप यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मे महिन्यात मुंबईतील स्थिती काय असेल ही चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे.

दोन दिवस पावसाचा अंदाज

राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. अजूनही काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे या भागात हलक्या सरींची शक्यता आहे. तर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.

उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज

पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेल्या भागात गुरुवारपासून उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे दोन दिवसांनी या भागातील नागरिकांना असह्य उकाडा सहन करावा लागणार आहे.

अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी अकोला येथे झाली. तेथे ४३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्याखालोखाल लोहगाव ४२.७ अंश सेल्सिअस, जळगाव ४१.८ अंश सेल्सिअस, पुणे ४०.८ अंश सेल्सिअस, मालेगाव ४१.८ अंश सेल्सिअस आणि सोलापूर येथे ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

विदर्भाचे तापमान ४० अंशापुढेच

विदर्भातील सर्वच भागातील कमाल तापमान मंगळवारी ४० अंशापुढे नोंदले गेले. अमरावती येथे ४१.६ अंश सेल्सिअस, बुलढाणा ३९.६ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ४२.६ अंश सेल्सिअस, गोंदिया ३९.२ अंश सेल्सिअस, नागपूर ४१.४ अंश सेल्सिअस, वाशिम ४१.२ अंश सेल्सिअस, वर्धा ४१.५ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ येथे ४२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.