मुंबई : मार्च महिन्यात मुंबईत १२ हजार ३५८ घरांची विक्री झाली असून यातून राज्य सरकारला १,१३७ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. नव्या वर्षातील आतापर्यंतची ही उंच्चांकी घर विक्री असली तरी २०२१ आणि २०२२ मधील मार्चच्या तुलनेत घर विक्रीचे हे प्रमाण कमी आहे.
हेही वाचा >>> मुंबईतल्या मालाडमध्ये राम नवमी शोभायात्रेवेळी गोंधळ, तीन गटांमध्ये राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज
मार्च आणि डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर घर विक्री होते. तर दस्तनोंदणी करून मुद्रांक शुल्क भरण्याकडे ग्राहकांचा कल असतो. रेडिरेकनरच्या दराक १ एप्रिलपासून वाढ होत असून त्याअनुषंगाने मुद्रांक शुल्क वाढते. त्यामुळे मार्चमध्ये घरांची विक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीतही वाढ होते. या पार्श्वभूमीवर मार्च २०२१ मध्ये मुंबईत विक्रमी घर विक्री झाली होती. तब्बल १७ हजार ७२८ घरांची विक्री झाली होती. तर मार्च २०२२ मध्ये १६ हजार ७२६ घरांची विक्री झाली होती. यातून सरकारला १,१६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. यंदा मार्चमध्ये १२ हजार ३५८ घरांची विक्री झाली आहे. घर विक्री १५ हजारांची संख्या गाठू शकलेली नाही. घरांच्या वाढलेल्या किंमती, गृहकर्जाच्या व्याज दरात झालेली वाढ याचा घर विक्रीवर परिणाम झाला असावा. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचाही फटका दस्त नोंदणीला बसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.