मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार याची मुंबईकरांना प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे या प्रकल्पातील ५७६ बाधितांना योग्य पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) तीन पुनर्वसन इमारतींची कामे हाती घेतली आहे. त्यापैकी दोन इमारतींची कामे सुरु आहेत. मात्र ही कामे अत्यंत संथगतीने सुरु आहेत. तर एका इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही. परिणामी पुनर्वसित इमारतींच्या खर्चात आणि रहिवाशांना घ्याव्या लागणाऱ्या घरभाड्याच्या रकमेत १८०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकल्पबधितांना घरभाड्यापोटी द्याव्या लागणाऱ्या रक्कमेतही मोठी वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये जिथे एमएमआरसीला वर्षाला घरभाड्यापोटी दोन कोटी ३८ लाख ७५ हजार ६३० रुपये खर्च करावे लागत होते, तिथे आता २०२३-२४ मध्ये ही रक्कम थेट ४६ कोटी ३९ लाख ७३ हजार ६७ रुपये अशी झाली आहे.

हेही वाचा – Mumbai Molestation Case : मुलींना रिक्षाने शाळेत पाठवताना सावधान, मुंबईत समोर आला धक्कादायक प्रकार!

एमएमआरसीकडून ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो ३ मार्गिकेचे काम सुरु आहे. ही मार्गिका आतापर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र कामास विलंब झाल्याने मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झालेली नाही. आता एमएमआरसीने शक्य तितक्या लवकर मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी अशा पहिल्या टप्प्यातील मार्गिकेचे लोकार्पण करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार तयारी सुरु आहे. एकीकडे मेट्रो ३ मार्गिकेस विलंब झाला असतानाच या मार्गिकेतील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसनही अत्यंत संथगतीने सुरु आहे. या मार्गिकेतील काळबादेवी-गिरगाव परिसरातील जुन्या इमारतीतील ५७६ रहिवाशी बाधित झाले आहेत. या रहिवाशांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी एमएमआरसीने घेतली आहे. त्यानुसार या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी तीन उत्तुंग इमारती बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१७ पासून पुनर्वसनाचे काम हाती घेतले. मात्र अद्याप एकही इमारत पूर्ण झालेली नाही.

हेही वाचा – मुंबई : कॉफीमध्ये झुरळ सापडल्याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा

काळाबादेवी येथे १३१.५३ कोटी रुपये खर्च करत एक इमारत बांधण्यास सुरुवात केली. ही इमारत डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम पूर्ण न झाल्याने आता ही इमारत जुलै २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याचे माहिती अधिकाराअंतर्गत समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना एमएमआरसीने ही माहिती दिली आहे. गिरगावमधील दुसऱ्या इमारतीच्या कामासही याआधीच सुरुवात झाली आहे. ४०४.६६ कोटी रुपये खर्च करत बांधण्यात येणाऱ्या या दुसऱ्या इमारतीचे काम फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. भुलेश्वर येथील इमारतीच्या कामासाठी अद्याप निविदाही काढण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वच प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठी अजूनही काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान काळबादेवी आणि गिरगावमधील पुनर्वसित इमारतींची कामे संथगतीने सुरु असल्याने काळबादेवीतील इमारतीच्या खर्चात ३.७० कोटींनी तर गिरगावमधील पुनर्वसित इमारतीच्या खर्चात ६६.३१ कोटींनी वाढ झाली आहे. त्याचवेळी या प्रकल्पबाधितांना वर्षाला द्याव्या लागणाऱ्या घरभाड्याच्या रक्कमेत चालू वर्षात थेट १८०० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. २०१७-१८ मध्ये जिथे एमएमआरसीला वर्षाला घरभाड्यापोटी दोन कोटी ३८ लाख ७५ हजार ६३० रुपये खर्च करावे लागत होते, तिथे आता २०२३-२४ मध्ये ही रक्कम थेट ४६ कोटी ३९ लाख ७३ हजार ६७ रुपये अशी झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rehabilitation of 576 project affected people in metro 3 route at slow pace as a result cost of rehabilitated buildings increased dramatically mumbai print news ssb