मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील नियमबाह्य आकाराचे म्हणजे ४० फूट बाय ४० फूटपेक्षा अधिक आकाराचे सर्व जाहिरात फलक रेल्वे प्रशासनाने तातडीने हटवावेत, या आशयाची नोटीस मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला पाठवली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी ही नोटीस बजावली आहे.
घाटकोपरमधील छेडानगर परिसरातील महाकाय जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडल्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व फलकांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार मुंबईत फक्त ४० फूटापर्यंत लांबी रुंदी असलेल्या फलकांनाच परवानगी दिली जाते. मात्र रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक अवाढव्य आकाराचे आहेत. तसेच मुंबई महापालिकेची परवानगी न घेताच हे फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने घाटकोपर दुर्घटनेनंतर या नोटीसा पाठवल्या आहेत.
हेही वाचा – म्हाडा वसाहतींच्या भाडेपट्ट्यातील वाढ कमी होणार? प्राधिकरणाकडून दरवाढीचा पुन्हा आढावा
घाटकोपरमधील छेडानगर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळाची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बुधवारी पाहणी केली. घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईतील अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासन कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. दरम्यान, दुर्घटनास्थळी महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अन्य तीन जाहिरात फलकांवर युद्धपातळीवर निष्कासन कारवाई सुरू आहे. तीनपैकी दोन जाहिरात फलक बुधवारी रात्रीपर्यंत, तर एक जाहिरात फलक गुरुवारी १६ मे रोजी काढण्यात येईल, असे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. वाऱ्याचा वेग, वाहतूक व्यवस्थापन, उपलब्ध मनुष्यबळ यांची सांगड घालून ही कारवाई युद्ध पातळीवर सुरू आहे. दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या मदतकार्यात अडथळा न आणता या तीन फलकांच्या निष्कासन कारवाईला वेग दिला जात आहे. जाहिरात फलकांच्या लोखंडी सांगाड्याचे सुटे भाग करण्याचे आणि ते खाली उतरविण्याचे काम अविरत सुरू आहे.
वांद्रे स्थानकातील अवाढव्य फलकालाही नोटीस
पालिकेच्या एच पूर्व विभागाने पश्चिम रेल्वेला नोटीस पाठवून वांद्रे स्थानक परिसरातील सर्व जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र मागितले आहे. वांद्रे स्थानक परिसरात पूर्व बाजूला एक भला मोठा फलक असून त्याची लांबी, रुंदी १२० फूट आहे. लोकल गाडीतून हा फलक स्पष्ट दिसतो. या फलकासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.