मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. पश्चिम उपनगरात वांद्रे दहिसरदरम्यानच्या मार्गावर एकूण ४४ पूल व भुयारी मार्ग आहेत. या सर्वांची दुरुस्ती करण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून या कामाला डिसेंबरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.

एमएमआरडीएने २०२२ मध्ये पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग देखभालीसाठी मुंबई महानगरपालिकेकडे दिला होते. त्यावेळी या मार्गावरील पुलासहीत मार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते. या महामार्गाच्या हस्तांतराच्या वेळी पूर्व आणि पश्चिम महामार्गावरील पादचारी पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग व स्कायवॉक महापालिकेला सुपूर्द करण्यात आले होते. त्यामुळे या पुलांची देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. त्यामुळे महापालिकेने पहिल्या टप्प्यात पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग व स्कायवॉकची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेने या पुलांची व्हिजेटीआयमार्फत संरचनात्मक तपासणी करून घेतली होती. त्यानुसार या पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मेधा सोमय्या यांनी दाखल केलेले अब्रुनुकसानीचे प्रकरण : संजय राऊत यांची शिक्षा स्थगित, जामिनही मंजूर

हेही वाचा – मालाडमध्ये नवीन पूल, पालिका करणार १९२ कोटी रुपये खर्च

एमएमआरडीएने पुलांचे हस्तांतरण केल्यानंतर त्यांचे संरचनात्मक आराखडे व डिजाइन मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध केलेले नाहीत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून द्रुतगती मार्गावरील पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग व स्कायवॉकचे संरचनात्मक परिक्षण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्या मान्यतेने व्ही.जे.टी.आय.मार्फत करण्यात आले होते. त्यानुसार पुलांच्या दुरुस्तीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने ४४ पूल व भुयारी मार्गांची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील पुलांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे.