मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या वाढीचा आलेख वेगाने वर जात असून गुरुवारी शहरात २० हजार १८१ नवे रुग्ण आढळले आहेत.
शहरात ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे रुग्णसंख्याही झपाटय़ाने वाढत आहे. मागील दोन दिवसांपासून रुग्ण संख्येमध्ये सुमारे पाच हजारांची भर नव्याने पडत आहे. बुधवारी पालिकेने सुमारे ६० हजार चाचण्या केल्या असून यातून २० हजार १८१ रुग्ण नव्याने आढळले आहेत. बाधितांपैकी ८५ टक्के म्हणजेच १७ हजार १५४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत, तर १ हजार १७० रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील १०६ रुग्णांना प्राणवायू लावावा लागला आहे. गुरुवारी दिवसभरात २,८३७ रुग्ण करोनामुक्त झाले. गुरुवारी शहरात चार जणांचा मृत्यू झाला.
धारावीत दिवसभरात १०७ रुग्ण
धारावीमध्ये गुरुवारी एका दिवसात १०७ रुग्ण नव्याने आढळले आहेत. आत्तापर्यत धारावीमध्ये एका दिवसांत इतक्या मोठय़ा प्रमाणात रुग्ण प्रथमच आढळले आहेत. बुधवारी धारावीमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या ४० होती. एका दिवसात रुग्णसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे.
गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल होणे बंधनकारक
प्रसूतीच्या दोन आठवडे गर्भवती महिलेला करोनाची बाधा झाल्यास गृहविलगीकरणात ठेवता येणार नाही. त्यामुळे अशा महिलांना रुग्णालयात दाखल होणे आता बंधनकारक असणार आहे. विलगीकरणाबाबत नवीन नियम पालिकेने जोडलेला आहे.