मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस भटक्या श्वानांची संख्या वाढत असून भटक्या श्वानांकडून मनुष्यावर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये (२०२० ते २०२३) मुंबईत ३५०८ श्वान चावल्याच्या घटना घडल्या आहेत. महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहातून माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे यापैकी केवळ एक प्रकरण पाळीव श्वानाशी संबंधित असून उर्वरित प्रकरणात भटक्या श्वानांचा समावेश आहे.

हेही वाचा >>> पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण; बार व्यवस्थापकाला अटक

मुंबई महानगरपालिकेतर्फे सातत्याने भटक्या श्वानांसाठी रेबीज लसीकरणाबाबत मोहीम राबविण्यात येते. तसेच, त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण राहावे यासाठी निर्बीजीकरणही करण्यात येते. गेल्या काही वर्षांमध्ये भटक्या श्वानांमध्ये आक्रमकता वाढली असून चावा घेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. परिणामी, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. २०२० ते २३ या कालावधीत भटक्या श्वानांच्या चाव्यासोबतच पाळीव श्वानांचे परवाने जारी करण्यातही वाढ झाली आहे. या कालावधीत एकूण १९ हजार १५८ परवाने जारी करण्यात आले आहेत. तसेच, २०२० या वर्षात परवान्यांची संख्या २५८१ होती.

हेही वाचा >>> गिरणी कामगार आणि वारसांचा उद्या आझाद मैदानावर मोर्चा; दीड लाख कामगारांच्या घरांसाठी ठोस पावले उचला, मुंबईत घरे द्या,

परवान्यामध्ये वाढ होत असतानाही योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कालावधीदरम्यान केवळ ४९ पाळीव प्राण्यांच्या मालकांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, २०२० मधील कुत्रा चावण्याच्या घटनांची संख्या ६१० वरून २०२३ मध्ये ११२३ पर्यंत पोहोचली. गेल्या पाच वर्षांमध्ये रात्रीच्या वेळी श्वानांना खायला घालण्याच्या प्रकारात दुपटीने वाढ झाली आहे. योग्य काळजी आणि व्यवस्थापनाशिवाय भटक्या श्वानांच्या संख्येत अनियंत्रित वाढ झाल्यामुळे रहिवाशांवर हल्ले होण्याचा धोका वाढतो, असे गिरगावमधील रहिवासी नील शाह यांनी सांगितले. तर, मुंबई महानगरपालिकेने केवळ भटक्या श्वानांच्या संख्येवर लक्ष न ठेवता भटक्या आणि पाळीव श्वानांवर होणाऱ्या क्रूरतेशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी एक समर्पित पोर्टल तयार करायला हवे. भारतीय प्राणी कल्याण मंडळाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पाळीव प्राण्यांचे मालक नियमांची अंमलबजावणी करतात का, याची तपासणी करावी, असे मत ‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन’चे जितेंद्र घाडगे यांनी व्यक्त केले.