मुंबई : मुंबईत जानेवारी-मे या कालावधीत हिवतापाचे १,६१२ रुग्ण आढळले. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे हिवताप निर्मूलनासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका करीत असलेले प्रयत्न अपुरे असल्याचे निदर्शनास आले आहे.

सरकार आणि पालिका हिवताप निर्मूलनासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. मात्र तरीही गेल्या पाच महिन्यांमध्ये हिवतापाचे एक हजार ६१२ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत २०२१ मध्ये हिवतापाचे १,४०१ रुग्ण सापडले. तर, २०२२ मध्ये ८९३ रुग्ण आणि २०२३ मध्ये १ हजार १९० इतके रुग्ण आढळले होते. २०२२ मधील जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत हिवतापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शिवाय डेंग्यू, हेपेटायटिस आणि चिकनगुनिया या आजारांच्या तुलनेतही गेल्या पाच महिन्यांत हिवतापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये डेंग्यूचे ३३८, चिकनगुनियाचे २१ व हेपेटायटिसचे २४८ रुग्ण सापडले.

हेही वाचा…डिजिटल फलक रात्री ११ नंतर बंद; पालिकेच्या पथकाची तपासणी मोहीम

साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत २०२१ व २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये लक्षणीय वाढ झाली. पालिकेने २०२३ मध्ये रुग्णांची नोंद घेण्याची व्याप्ती वाढवली होती. पूर्वीच्या २२ ऐवजी थेट ८८० वैद्याकीय संस्थांनी आजारांच्या रुग्णांच्या संख्येची नोंद करण्यास सुरुवात केली. यात रुग्णालये, दवाखाने व वैद्यकीय प्रयोगशाळांचाही समावेश आहे. त्यामुळे २०२३ मध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

८५ संघटनांना प्रशिक्षण

जागतिक हिवताप निर्मूलन दिनाचे औचित्य साधून हिवतापाच्या निर्मूलनासाठी नायर दंत रुग्णालयात पालिका व महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे परिसंवाद घेण्यात आला. त्यात देशातील ८५ भारतीय वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, खासगी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. शिवाय विविध विभागांतील ४८२ डॉक्टरांचा समावेश आहे.

हेही वाचा…मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकलमधून उतरून रेल्वे रूळावरून चालत जाण्याची प्रवाशांवर वेळ

वर्ष – हिवताप – डेंग्यू – चिकनगुनिया – हेपटायटिस

२०२१ – १४०१ – ३७ – ० – ६४

२०२२ – ८९३ – ८४ – 0४ – १८८

२०२३ – ११९० – ३५६ – ६१ – २५४

२०२४ – १६१२ – ३३८ – २१ – २४८