मुंबई : शेअर्स खरेदी -विक्री व्यावहारातून नफा मिळवण्यासाठी व्यावसायिक डीमॅट खाते उघडण्यास सांगून गोरेगावमधील रहिवाशाची ५२ लाख ५० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मागे सराईत टोळीचा हात असल्याचा संशय असून बँक व्यवहारांच्या माध्यमातून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे. एकट्या मुंबईत नोव्हेंबर महिन्यापर्यंत ५५ हजार जणांनी सायबर फसणूक झाल्याच्या तक्रारी केल्या असून त्यात सुमारे १२०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
गोरेगाव (पूर्व) परिसरात वास्तव्यास असलेले ५२ वर्षीय तक्रारदारांना २४ सप्टेंबर रोजी अनामिका नावाच्या महिलेचा दूरध्वनी आला होता. तिने शेअर्स खरेदी – विक्री व्यवहाराविषयी माहिती देऊन ग्रॅँड इंटरप्रायजेस या व्हॉट्स ॲप ग्रुपवर तक्रारदाराला सहभागी केले. त्या ग्रुपचे चार ॲडमिन होते. आपण प्रॉफीट पल्स इंडियासाठी काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यात दिलेल्या माहितीच्या आधारे तक्रारदाराने त्याच्या स्वतःच्या डिमॅट खात्यावरून ट्रेडिंग करण्यास सुरूवात केली. त्यांना काही नफाही झाला. आपल्यामार्फत व्यावसायिक डिमॅट खाते उघडल्यास अधिक फायदा होईल, असे आरोपींनी तक्रारदाराला सांगितले. त्याबाबत एक ई-मेलही पाठवला. अखेर त्यांना एक ग्राहक क्रमांक देण्यात आला. त्या क्रमांकावरून तक्रारदाराच्या नावाने व्यावसायिक डीमॅट खाते उघडण्यात आले. तक्रारदाराने सुरूवातीला त्यात पाच हजार रुपये जमा केले. त्यानंतर ५० हजार रुपये जमा केले. त्यांना चांगला नफा झाल्याचे स्क्रीन शॉर्ट्स तक्रारदाराच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवण्यात आले. त्यानंतर तक्रारदाराने व्हॉट्स ॲप ग्रुपवर सांगितल्याप्रमाणे पैसे जमा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तक्रारदाराने गुंतवणूक केलेल्या ५२ लाख ५० हजार रुपयांचे ९५ लाख २७ हजार रुपये झाल्याचे निदर्शनास आले. चांगला नफा झाल्यामुळे तक्रारादाराने ती रक्कम काढण्याची विनंती केली. त्यावेळी २१ टक्के कमिशन व जीएसटी कर भरावा लागेल, असे सांगण्यात आले. तक्रारदाराला संशय आल्यामुळे त्यांनी संंबधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी याप्रकरणी १९३० या सायबर हेल्पलाईनवर दूरध्वनी केला. सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. तक्रारदाराने उपलब्ध केलेल्या बँक खात्यांच्या माध्यमातून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.
हेही वाचा…मुजोर रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी, बेस्ट बसलाही अडथळा ठरत असल्याने कारवाईची मागणी
सायबर गुन्ह्यांमध्ये साडेचार पटींनी वाढ
मुंबईत नोव्हेंबर २०२३ पर्यंत केवळ २६२ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. यावर्षी प्रथमच मुंबईतील सायबर फसवणुकीची रक्कम हजार कोटींवर पोहोचली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुंबईत ११८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. मुंबईतील नागरिकांची सायबर फसवणुकीतील रक्कम तात्काळ वाचवण्यात मदत व्हावी, यासाठी मुंबई पोलिसांनी १९३० हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. वाढत्या सायबर फसवणुकींमध्ये या हेल्पलाईन क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींच्या दूरध्वनींमध्येही प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या वर्षीय या हेल्पाईनला पाच लाखांहून अधिक तक्रारीचे दूरध्वनी आले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत या हेल्पलाईनवर सुमारे ९१ हजार दूरध्वनी आले होते. त्यातही यावर्षी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक टोळ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याच्याशी संबंधित ६५०० अवैध सीमकार्ड पोलिसांनी बंद केली आहेत.