गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटन वा अन्य कारणांसाठी स्वित्र्झलडमध्ये गेलेल्या व तेथील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या मुंबईकरांना मोठय़ा आर्थिक दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
स्वित्र्झलडमधील पोलिसांनी तेथील न्यायालयाच्या नोटिशीच्या आधारे या संबंधात मुंबई पोलिसांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार २००८ सालापासून स्वित्र्झलडला गेलेल्या आणि तेथील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या सुमारे डझनभर मुंबईकरांना ८ ते ५३ हजार रुपयांपर्यंतच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी पर्यटकांना दंडाची रक्कम भरा अथवा न्यायालयीन कारवाईला सामोरे जा, असे आदेश स्वित्र्झलडच्या न्यायालयाने बजावले आहेत. २००८ पासून मुंबई पोलिसांकडे या प्रकारची पत्रे येत आहेत. २००८ पासून चंदन खन्ना, अमित धन्नलाल, असित मेहता, मोहम्मद इस्माईल लकडावाला, सचिन परब, नीरज कायथवाल यांच्या नावाने ही कारवाईची पत्रे गुन्हे शाखेला मिळाली आहेत.