मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि ठाणे स्थानकांतील अत्यावश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यासाठी ठाण्याच्या फलाट क्रमांक ५-६ चे रुंदीकरण आणि सीएसएमटी येथे फलाट क्रमांक १०-११ चे नॉन-इंटरलॉकिंग काम सुरू आहे. त्यामुळे ठाण्यात ६३ तास आणि सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्यात आला आहे. या ब्लाॅककाळात नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प मध्य रेल्वेने सोडला असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर कामे करण्यात येत आहेत.
सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवाशांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेवरील सीएसएमटी आणि ठाणे स्थानकांमध्ये अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणांची कामे सुरू आहेत. ठाणे स्थानकावरील फलाट क्रमांक ५-६ च्या रुंदीकरणासाठी ६३ तासांचा विशेष ब्लॉक सुरू आहे. या कामामुळे या फलाटावर सरकते जिन्याची व्यवस्था करता येईल. त्याचबरोबर पादचारीपुलाची रुंदी वाढविण्यास वाव मिळाणार आहे. शनिवारी पहाटे ४.०५ वाजता फलाट क्रमांक ५ येथे आरसीसी बाॅक्स टाकण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. तसेच मिलिटरी बोगी वेल टाईप (एमबीडब्लूटी) रेकवरून पोकलेन एक्साव्हेटर आणि रोलरसह यंत्रसामग्री आणि साहित्य त्वरित ठाण्याहून कल्याणच्या दिशेकडे नेण्यात आली. पहाटे ५.३० वाजता एमबीडब्लूटी रेकच्या मदतीने पोकलेन आणि रोलर मुलुंड गुड्स स्थानकात पाठविण्यात आले. तसेच सध्या आरसीसी बाॅक्स टाकलेल्या ठिकाणी काम सुरू आहे. दोन आरसीसी बाॅक्समधील पोकळी सिमेंट-क्राॅक्रिटने भरण्याचे काम सुरू असून या बाॅक्सला फलाटाचे स्वरूप दिले जात आहे. सिमेंट-क्राॅक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. ब्लाॅक काळात नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी ३५० अधिकारी आणि कर्मचारी २४ तास काम करीत आहेत, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
हेही वाचा – धारावी प्रीमियर लीगदरम्यान ड्रोनचा बेकायदेशीर वापर, शाहू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १०-११ च्या विस्तारकरण्याबाबत नाॅन-इंटरलाॅकिंगसाठी ३६ तासांचा ब्लाॅक घेण्यात आला आहे. एक कार्यक्षम आणि एकात्मिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिग्नलिंग सिस्टमची अंमलबजावणी होत आहे. या कामामुळे रेल्वे सुरक्षा आणि भविष्यातील गतिशीलता वाढवणे शक्य होणार आहे. सध्या सुरू असलेल्या कामांची बारकाईने तपासणी आणि सिग्नलिंग सिस्टीमचे संक्रमण, रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष आहे. ७५ पैकी ६५ पॉइंट्स, १२० पैकी ५१ ट्रॅक आणि ६० पैकी १ सिग्नलचे काम शनिवारी दुपारपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाले. सीएसएमटी येथे २५० हून अधिक अत्यंत कुशल आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कर्मचाऱ्यांच्या मदतीने काम सुरू होते.
हेही वाचा – मुंबई : करी रोड, डिलाईल रोड, लोअर परळमध्ये ६, ७ जून रोजी पाणीपुरवठा बंद
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव यांनी ठाणे येथील कामांचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांनी संवाद साधताना ते म्हणाले की, ठाण्यातील काही महिन्यांचे काम काही तासांत करण्यात येत आहे. नियोजनानुसार सर्व कामे सुरू आहेत. संपूर्ण कामांची पाहणी करण्यात आली आहे. ब्लाॅकमुळे प्रवाशांना त्रास होतो. मात्र, अशी कामे करण्यासाठी काही लोकल, रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागतात. यामुळे भविष्यात प्रवाशांना नक्कीच फायदा होईल. तसेच पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण झाली असून यावेळी लोकल थांबणार नाही, असे यादव म्हणाले.