Mumbai Road Accident : मुंबईत मंगळवारी (३ सप्टेंबर) एक मोठा रस्ते अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या मालाड परिसरात एका वेगवान कारने २७ वर्षीय तरुणीला धडक दिली. शाहना काझी असं या तरुणीचं नाव असून ती मेहंदी क्लासवरून घरी परतत होती. ती रस्त्याच्या कडेने चालत असतानाच मागून येणाऱ्या एका भरदाव कारने तिला धडक दिली. यात शाहनाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तिला अनेक ठिकाणी गंभीर इजा झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या शाहनाला इतर पादचारी व स्थानिकांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.मृतक शाहना काझी हिला दोन लहान मुलं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, अपघातानंतर इतर पादचारी व जमावाने हा अपघात करणाऱ्या वाहनचालकाला बेदम चोप दिला. स्थानिकांनी सांगितलं की शाहना काझी ही नेहमीप्रमाणे रात्री १० च्या सुमारास मेहंदी क्लास आटपून घरी परतत होती. त्याचवेळी एक भरदाव फोर्ड एंडेव्हर एसयूव्ही मागून आली. या कारने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात ती जबर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा >> एसटी प्रवाशांचा खोळंबा; गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, संपामुळे २५१ पैकी ५९ आगारांचे कामकाज ठप्प

आरोपी मर्चंट नेव्हीमधील कर्मचारी

अनुज सिन्हा असं कार चालवत असलेल्या इसमाचं नाव आहे. तो मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. तो सध्या सुट्टीवर घरी आला होता. अनुजनेच पादचाऱ्यांच्या मदतीने शाहनाला रुग्णालयात नेलं होतं. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी अनुज सिन्हा याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने परिक्षणासाठी घेतले आहेत. तो मद्यपान करून कार चालवत होता का याची तपासणी केली जाणार आहे.

हे ही वाचा >> मुंबई : डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण, सगळे गुन्हे एकत्रित करण्याच्या मागणीसाठी आव्हाड उच्च न्यायालयात

आरोपीला आज न्यायालयासमोर हजर करणार

मृत महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मालाड पोलिसांनी आरोपी अनुजविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २८१, २८५, १०५, १८४, १८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील कार्यवाहीला सुरुवातही केली आहे. आरोपीला आज (बुधवार, ४ सप्टेंबर) न्यायालयासमो हजर केलं जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai road accident woman dies merchant navy officer speeding suv struck in malad asc