Malad Road Rage: मालाड पूर्व येथे १३ ऑक्टोबर रोजी मनसे कार्यकर्ता आकाश माईन (२७ वर्ष) याची जमावाने हत्या केली. ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झालं. ज्यात आकाश माईनचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतल्याचं सांगितलं जातं. आकाश आणि त्याची पत्नी दुचाकीवरून जात असताना एका रिक्षाचालकानं त्यांना कट मारला त्यावरून त्यांचा वाद झाला. या वादानंतर रिक्षाचालकाने त्याच्या सहकाऱ्यांना बोलवून घेतलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आकाशच्या अंगावर त्याची आई पडलेली दिसत असून त्याला मारहाणीपासून वाचवताना दिसत आहे. यानंतर आता आकाशच्या आईनं त्यादिवशी काय घडलं? याची माहिती दिली.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आकाशची आई दिपाली यांनी त्यादिवशीचा प्रसंग सविस्तर सांगितला. आकाश हैदराबादमध्ये एका टेक कंपनीत नोकरी करत होता. सात महिन्यांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. आकाशने दसऱ्याच्या दिवशी चारचाकी वाहन बुक केलं होतं. १३ तारखेला कारच्या शोरुमधून आकाश आणि त्याची पत्नी मालाडमधील आई-वडीलांच्या घरी येत होते. त्यावेळी मालाड पूर्वेतील शिवाजी चौकात रिक्षाचालकाशी त्याचा वाद झाला.
आकाशच्या आईनं काय सांगतिलं?
“आकाश आणि रिक्षाचालक अविनाश कदम यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर माझ्या सूनेनं लगेच मला फोन करून याबाबत कळवलं. माझे पती दत्तात्रेय आणि मी एका दुसऱ्या रिक्षातून त्यांच्यापासून थोड्या अंतरावर होतो. आम्ही लगेच शिवाजी चौकात पोहोचलो”, अशी माहिती आकाशची आई दिपाली यांनी दिली. त्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या पदाधिकारी आहेत.
दिपाली पुढे म्हणाल्या, “आरोपी अविनाश कदमने फोन करून १५ ते २० माणसांना बोलावून घेतलं. मी आणि माझे पती भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत होतो. आकाशनंही दुचाकीवर बसून तिथून निघण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने त्याला दुचाकीवरून खाली खेचलं. आमच्या डोळ्यादेखत जमावाने आकाशवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केला. आकाश जमिनीवर कोसळल्यानंतर मी त्याच्या अंगावर पडून त्याला मारहाणीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जमावाने मला आणि आकाशला मारहाण सुरूच ठेवली. माझे पती दत्तात्रेय यांनाही काही जणांनी मारलं. जमावातील काही जण तलावर आणून मारण्याची भाषा वापरत होते.”
हे ही वाचा >> मुंबई : मनसे कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना अटक
ही मारहाण होत असताना तिथे बरीच गर्दी जमली होती. पण कुणीही भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. अनेकजण व्हिडीओ काढण्यात मश्गूल होते, असे धक्कादायक वास्तव दिपाली यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते, असे टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या बातमीत सांगितलं.
दत्तात्रेय यांनी १०० नंबरवर फोन करून पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर त्यांनी काही हल्लेखोरांना ताब्यात घेतलं. तर काही जण पळून गेले. दिपाली आणि दत्तात्रेय यांनी बेशुद्ध पडलेल्या आकाशला जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमाकेअर रुग्णालयात भरती केले. पण रुग्णालयाचा कारभार फारच संथ होता. वरिष्ठ डॉक्टर येईपर्यंत माझा मुलगा जखमांसह विव्हळत होता, असेही आकाशची दिपाली यांनी सांगितले.
आकाश यांची पत्नी अनुश्री माईन यांच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने अविनाश नामदेव कदम, अमित जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंह, जयप्रकाश दिपक आमटे, राकेश मलकु ढवळे, साहिल सिकंदर कदम यांना अटक केली आहे.