Mumbai Road Cleaning Twice Daily : मुंबईतील रस्ते यापुढे दिवसातून दोन वेळा स्वच्छ करण्यात येणार आहेत. सकाळी आणि संध्याकाळी रस्ते स्वच्छ करण्यासाठी पालिकेचा घनकचरा विभाग नियोजन करीत आहे. मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या विकासकामांमुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून प्रदूषण कमी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा रस्ते झाडण्याचा पालिका प्रशासन विचार करीत आहे.
मुंबईतील सव्वाकोटी लोकसंख्या आणि दररोज मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांची सुमारे ५० लाखांपर्यंतची चललोकसंख्या आहे. या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागावर आहे. पहाटे साडेसहा वाजता कामाला सुरूवात करून सुमारे २८०० किमी लांबीचे रस्ते व गल्ल्या पालिकेचे सफाई कामगार सकाळी झाडून स्वच्छ करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मुंबईत विकासकामे, बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढली असून रस्त्यावर धुळीचे प्रमाणही खूप वाढले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता सर्व विभागांमध्ये दिवसातून दोन वेळा रस्ते झाडण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
संध्याकाळी केल्या जाणाऱ्या रस्ते स्वच्छता कामासाठी मुंबई महापालिका कंत्राटी पद्धतीने सेवा घेणार आहे. या कामासाठी एका महिन्याकरीता पालिकेला १९ कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. बांधकामाशी संबंधित वाहनांची ये – जा रस्त्यावरून सुरू असते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ, माती जमा होते. वाहनांच्या वर्दळीमुळे ही धूळ वातावरणात उडत असते. त्यामुळे प्रदूषण वाढते. यावर उपाय म्हणून दोन वेळा रस्ते स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
४४ हजार कामगारांची फौज
मुंबई हे आंतराष्ट्रीय शहर असून इथे मोठमोठ्या कंपन्या, मोठ्या संख्येने दुकानदार, फेरीवाले, उपाहारगृहे, खाऊगल्ल्या, झोपडपट्टया, उच्चभ्रू इमारती असे गुंतागुंतीचे शहर आहे. पालिकेचे कामगार, कंत्राटी कर्मचारी असे मिळून सुमारे ४४ हजार कामगार तीन पाळ्यांमध्ये या विभागात काम करतात. सर्वाधिक कामगार असलेला हा विभाग आहे. पहाटे साडेसहा वाजता सफाई कामगार कामावर रुजू होतात.
सध्या अतिमहत्त्वाच्या विभागातच दोन वेळा स्वच्छता
मुंबईत सध्या चर्चगेट, कुलाबाचा समावेश असलेला ए विभाग आणि मलबार हिल, ग्रॅंटरोडचा भाग असलेल्या डी विभागातील रस्ते दोन वेळा स्वच्छ केले जातात. बाकी संपूर्ण मुंबईत केवळ सकाळी रस्ते स्वच्छ केले जातात. संपूर्ण मुंबईत दररोज सकाळी ७ ते साडे दहावाजेपर्यंत रस्ते झाडण्याचे काम केले जाते. केवळ ए आणि डी विभागात साडेसहा ते साडेआठ दरम्यान रस्त्यांवरील कचरा उचलण्याचे काम पूर्ण केले जाते. मात्र आता सर्व २५ विभागांमध्ये दोन वेळा रस्त्यावरील कचरा स्वच्छ केला जाणार आहे.