मुंबई : तापमानातील घट आणि प्रदूषित घटकांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरांतील हवा प्रदूषण अतिप्रदूषित पातळीवर पोहोचले आहे. मुंबईतील माझगाव, कुलाबा, अंधेरी, मालाड, चेंबूर या भागांसह नवी मुंबई शहरातील हवेत विषारी घटकांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. माझगाव येथील हवा धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल ‘सफर’ या संकेस्थळाद्वारे शुक्रवारी जाहीर करण्यात आला.
हवेतील प्रदूषण वाढवणाऱ्या सूक्ष्मकणांचे (पीएम २.५, १०) प्रमाण वाढत असतानाच नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाणही मुंबईच्या हवेत वाढत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या श्वसन प्रक्रियेवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. हवेच्या गुणवत्तेचा स्तर मोजणाऱ्या ‘सफर’ या संकेतस्थळावर शुक्रवारी माझगाव येथील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण ४७५ इतके नोंदवण्यात आले. वांद्रे-कुर्ला परिसर आणि नवी मुंबई येथेही या वायूचे प्रमाण अडीचशेच्या वर होते.
प्रदूषणाचा निर्देशांक
माझगाव ३३८
चेंबूर ३१९
नवी मुंबई ३३३
कुलाबा ३१३
अंधेरी ३२२
मालाड ३१४
(स्रोत : ‘सफर’ संकेतस्थळावरील २० जानेवारीच्या नोंदी)