मुंबई : शहर आणि उपनगरांत दोन दिवस झालेल्या पावसामुळे हवा दर्जा निर्देशांकात सुधारणा झाली आहे. काही भागात सातत्याने वाईट दर्जाची नोंद झाली होती. मात्र शुक्रवारी हवेचा दर्जा समाधानकारक होता. मुंबई आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून पाऊस कोसळला. पावसामुळे मुंबईची हवा स्वच्छ झाली आहे. हवेचा दर्जा गुरुवारी समाधानकारक पातळीवर नोंदवला गेला. याचबरोबर शुक्रवारीही गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक होता. गेले काही दिवस मुंबईत दिसणारे धुरके दूर होऊन वातावरणात बदल जाणवत आहे. हवा दर्जा निर्देशांकात झालेला हा सकारात्मक बदल पुढील एक – दोन दिवस कायम असेल. गेले अनेक दिवस मुंबईतील हवा खालावली होती.

हेही वाचा >>> मुंबईतील वाहतुकीत आज बदल, कशामुळे आणि बदल कसे असतील वाचा…

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार शुक्रवारी मुंबईतील कुलाबा, माझगाव, विलेपार्ले, वरळी येथे समाधानकारक हवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार शुक्रवारी सायंकाळी कुलाबा येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ९५ होता, माझगाव ५५, भायखळा ४३, चेंबूर ४३ , शिवाजी नगर येथील ८१ होता. तसेच उर्वरीत सर्व केंद्रावर हवेचा स्तर समाधानकारक होता. गेले काही दिवस मुंबईतील काही भागातील हवा गुणवत्तेची मध्यम ते वाईट श्रेणीत नोंद होत होती. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मुंबईकरांना प्रदुषणविरहीत हवा अनुभवता येत आहे. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० मधील समाधानकारक, १०१-२०० दरम्यान मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० दरम्यान अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते.

हेही वाचा >>> विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीच्या धडकेत पोलीस जखमी

दरम्यान, मुंबईत शनिवारी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर ठाणे, पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान ३६ अंशावर गेले होते. मात्र गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली आहे. अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीतून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पुढील तीन ते चार दिवस वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.