मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाच्या जोडणीमुळे मुंबईच्या इतिहासात एका नवीन तंत्रज्ञानाची भर पडली आहे. पूल दीड मीटर उचलण्याची ही एकमेव कामगिरी बर्फीवाला पुलाच्या बाबत घडली आहे. तब्बल तीन हजार मेट्रीक टन वजनाचा हा पूल उचलून तो गोखले पुलाच्या समांतर पातळीवर आणण्याचे काम तज्ज्ञांच्या पथकाने पार पाडले आहे. त्यामुळे पूल तोडून नव्याने बांधण्याचा खर्चिक व वेळखाऊ उपाय करावा लागला नाही.
अंधेरी पश्चिमेला सीडी बर्फीवाला पूल हा इंग्रजी वाय आकाराचा पूल आहे. हा पुल पुढे गोखले पुलाला जोडला जातो. गोखले पूल पाडल्यानंतर मुंबई महापालिकेने गोखले पूल उभारण्याची तयारी केली. मात्र रेल्वेच्या रुळांवरून जाणाऱ्या पुलांची उंची वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यामुळे गोखले पुलाची उंची सुमारे दोन मीटर वाढवावी लागले. परंतु, त्यामुळे गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्यात दीड मीटर अंतर पडले. गोखले पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यावरून पालिकेच्या कारभारावर टीका झाली. मग गोखले पूल आणि बर्फीवाला पूल कसा जोडायचा यावर प्रचंड खल झाला.
हेही वाचा…शनिवारी पश्चिम आणि रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक
या दोन्ही पुलांची वरखाली झालेली पातळी जोडणे शक्य नसल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले होते. हे पूल जोडल्यास तीव्र उतार तयार होईल आणि अपघात होतील अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे बर्फीवाला पुलाचा जास्तीत जास्त भाग तोडून तो पुन्हा बांधण्याचा पर्याय पुढे आला होता. मात्र याबाबत पालिकेने व्हीजेटीआय संस्थेची मदत घेण्याचे ठरवले होते. व्हीजेटीआय संस्थेने जॅक लावून पूल वर उचलण्याचा सल्ला दिला होता. मात्र असा पूल उचलणे धोकादायक असल्याची भीती पालिकेच्या अभियंत्यांना वाटत होती. त्यामुळे याप्रकरणी पुन्हा मुंबई आयआयटीचा सल्ला घेण्यात आला. आयआयटीचे प्रा. भंभोले व प्रा. गोएल यांनीही पूल उचलण्याच्या पर्यायाला संमती दर्शवली.
या दोन्ही संस्थांनी मान्यता दिल्यानंतर या कामाला सुरुवात झाली होती. व्हीजेटीआय या संस्थेने आपल्या अहवालातच या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या सल्लागार संस्थेची शिफारसही केली होती. त्यानुसार हे अवघड काम या तीन संस्थांच्या देखरेखीखाली पार पाडले.
हेही वाचा…सजावटीसाठीच्या प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आणा, मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका
या कामासाठी व्हिजेटीआय या संस्थेने ९० दिवसांचा कालावधी व ९ ते १० कोटी रुपये खर्च अंदाजित केला होता. मात्र एसएमसी या संस्थेने हे काम ७८ दिवसांत पूर्ण केले. तसेच या कामाचा मोबदलाही कमी घेण्याची तयारी दर्शवली आहे. अत्यंत आव्हानात्मक आणि जोखमीचे हे काम या तीन संस्थांनी यशस्वी केले आहे.
हेही वाचा…मुंबई : भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीत ७ ते ८ लाख क्रिकेटप्रेमी
तीन हजार मेट्रीक टन वजनाचा पूल दीड मीटर उंचीने उचलण्याची ही कामगिरी मुंबईतील एकमेव असून आता हा पूल कोणत्याही इतर पुलाप्रमाणेच मजबूत आहे, अशी प्रतिक्रिया एसएमसी कंपनीचे सुहास मेहता यांनी व्यक्त केली आहे. मनोज समतानी, शक्ति सिंघ, मंगेश जोशी, भुजबळ राओ यांच्या पथकाने हे काम पूर्ण केले असून आता या पथकाने बर्फीवाला पुलाच्या दुसऱ्या बाजूचे काम हाती घेतले आहे.