मुंबई: प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाने दुमजली बस आणि आसन आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा असलेली प्रीमियम वातानुकूलित बसही दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ ऑगस्ट रोजी या दोन्ही बसना हिरवा कंदिल दाखविण्यात येणार आहे. मात्र दुमजली बस आणि प्रीमियम बस सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.
सध्या बेस्ट उपक्रमाकडे ४५ विनावातानुकूलित बस आहेत. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. दुमजली बसची प्रवासी क्षमता ७८ इतकी आहे. प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असलेल्या दुमजली वातानुकूलित बस टप्प्याटप्यात प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला असून यातील पहिली दुमजली बस ताफ्यात दाखल होत आहे. बेस्ट उपक्रमाने वीजेवर धावणाऱ्या वातानुकूलित ९०० दुमजली बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा >>> Maharashtra Latest News Live: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
दुमजली बसबरोबरच एकमजली वातानुकूलित आरामदायी प्रीमियम बस सेवाही सुरू करण्यात येणार आहे. अशी एक बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होत आहे. बेस्ट उपक्रमाने मोबाइल ॲपआधारित टॅक्सीप्रमाणे प्रीमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना या बसमधील आसन आगाऊ आरक्षित करता येणार आहे. मोबाइल ॲपद्वारे प्रवाशांना बसचा मार्ग, वेळ, त्या मार्गावर आणखी किती बस असतील याची माहिती मिळू शकेल. त्यानुसार नियोजन करून प्रवाशांना बसमधील आसन आरक्षित करता येईल आणि तिकीटाचे पैसे ऑनलाईन भरता येतील. सुमारे २०० प्रीमियम बस टप्प्याटप्याने ताफ्यात दाखल होणार असून पहिल्या टप्प्यात १० बस सेवेत येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.