स्टुडिओकडून समाज माध्यमांद्वारे माहिती

मुंबईः खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये शनिवारी रात्री शिवसेनेच्या ( शिंदे गट) कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्या प्रकरणानंतर स्टुडिओ तात्पुर्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत हॅबिटाट स्टुडिओने याबाबत इन्स्टाग्रावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली. विनोदी कलाकार कुणाल कामरा यांनी एका शोदरम्यान ‘गद्दार’ हा शब्द उच्चारला होता. तसेच कोणाचेही नाव न घेता एक गाणे सादर करण्यात आले होते. याप्रकरणानंतर शिवसैनिकांनी या स्टुडिओची तोडफोड केली. यापूर्वी वादग्रस्त ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो ही याच स्टुडिओमध्ये झाला होता.

हॅबिटॅटने त्यांच्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये काय म्हटले

“अलीकडील हल्ल्यांनी आम्ही हादरलो आहोत, चिंतेत आहोत आणि अत्यंत दुःखी आहोत. कलाकार हे त्यांच्या विचारांसाठी आणि सर्जनशील निवडींसाठी स्वतःच जबाबदार असतात. आम्ही कोणत्याही कलाकाराच्या सादर केलेल्या कंटेंटमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही, परंतु गेल्या काही घटनांमुळे आम्हाला वारंवार लक्ष्य केले जात आहे.

जणू आम्हीच कलाकारांसाठी एक प्रतिनिधी आहोत.” त्यांनी पुढे लिहिले, “आम्ही सध्या (स्टुडिओ) बंद करत आहोत, जोपर्यंत आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला व्यासपीठ देण्याचा योग्य मार्ग शोधत नाही आणि आमच्या संपत्तीचे संरक्षण करत नाही. आम्ही सर्व कलाकार, प्रेक्षक आणि हितधारकांना खुलेपणाने चर्चा करण्यासाठी आमंत्रित करतो, तसेच कलाकारांच्या अधिकारांचा सन्मान राखण्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करतो.”, असे इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला. या क्लबमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खिल्ली उडवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. त्यामुळे शिंदेंचा ठाण्यातही शिवसेनेच्या समर्थकांनी जोरदार निर्देशने केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांनी कुणाल कामराचे छायाचित्र जाळले.

खारमधील तोडफोडीप्रकरमी राहुल कनाल, कुणाल सरमळकर, अक्षय पनवेलकर, गोविंद पडी, राहुल तुरबाडकर, विलास चावरी, अमिन शेख, समीर महापदी, हिमांशू, शशांक कोदे. संदीप मालप, गणेश राणे, शोभा पालवे, कृष्णा ठाकूर, पवनज्योत सेठी, कल्पेश, कुरेशी हुजेफ, चांद शेख तसेच १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात सोमवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३२, १८९(२), १८९(३), १९०, १९१(२), ३२४(५), ३२४(६), २२३, ३५१(२), ३५२, ३३३, ३७(१), १३५ अंतर्गत खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हॅबिटॅट या स्टुडिओमध्ये वादग्रस्त ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोचे भाग शूट करण्यात आले होते. त्या वेळी देखील येथे जोरदार आंदोलन झाले होते.

खार पोलिसांनी स्टुडिओच्या ऑपरेटर्सची चौकशी केली होती, या शोमध्ये रणवीर अल्लाबादियाने एक वादग्रस्त विनोद केला होता. नंतर, रणवीर अल्लाबादियाने आपल्या जोकसाठी माफी मागितली आणि समय रैनाने त्याचे सर्व ‘लेटेंट’ एपिसोड यूट्यूबवरून हटवले. या प्रकरणात अल्लाबादिया, रैना आणि इतर अनेक कलाकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चौकशी सुरू आहे.