मुंबई : मुंबईत जुलै महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतली आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कधी ऊन, तर कधी सरी बरसतील.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोकण, तसेच घाटमाथ्यावर मुसळदार पाऊस कोसळला. समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात जोरदार पाऊस झाला. जुलैमधील पावसाने जूनची तूट भरून काढलीच, त्याबरोबर जून – जुलैमध्ये होणाऱ्या एकूण पावसापेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून पाऊस ओसरला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत हलक्या सरी कोसळतील. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ३.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ० मिमी पावसाची नोंद झाली.
मोसमी वाऱ्यांचा आस सध्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर कर्नाटकपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. या पुढील काही दिवस राज्यात काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, तर काही भागात उघडीप होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. आता पुढील तीन ते चार दिवस विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित भागात पावसाची उघडीप असण्याची शक्यता आहे.