मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मुंबईतील के. सी. महाविद्यालयाचे सभागृह भाजपच्या ‘विशेष संपर्क अभियान’ या कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी के. सी. महाविद्यालयाने भाजपचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची निवड केल्यामुळेही महाविद्यालय प्रशासनावर आक्षेप घेतला जात आहे. याबाबत ठाकरे गटाच्या युवा सेनेने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे तक्रारही केली आहे.
हैदराबाद सिंद नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ म्हणजेच ‘एचएसएनसी’ विद्यापीठाशी संलग्न असलेल्या मुंबईतील के.सी. महाविद्यालयात गुरूवार, १६ मे रोजी विद्यार्थ्यांना नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांचे दुपारी दीड वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. परंतु मंत्री शिंदे यांच्या आईचे निधन झाल्यामुळे हे व्याख्यान रद्द झाले. तसेच दुपारी सव्वादोन वाजता के. सी. महाविद्यालयाचे सभागृह भाजपच्या ‘विशेष संपर्क अभियान’ या कार्यक्रमासाठी भाड्याने देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना के. सी. महाविद्यालयाने राजकीय क्षेत्राशी निगडित कार्यक्रम शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यास परवानगी का दिली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा…मुंबई : शिवाजी पार्कवरील महायुतीच्या सभेची जय्यत तयारी, सव्वालाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित
दरम्यान, नवीन मतदार नोंदणी व नव मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती करण्याकरीता विद्यापीठे, महाविद्यालये व शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आचारसंहितेच्या कालावधीत आयोजित कार्यक्रमांमध्ये राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती व राजकीय पक्षाचे नेते – कार्यकर्ते यांचा कोणताही सहभाग असणार नाही. तसेच त्यांच्याकडून सदर कार्यक्रमाचा प्रचाराकरिता उपयोग करून घेता येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व शाळांना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने एक परिपत्रक काढून दिले होते. असे असतानाही के. सी. महाविद्यालयाने भाजपच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या संकुलातील सभागृह भाड्याने का दिले ? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे यांना का निवडले गेले ? असे सवाल ठाकरे गटाच्या युवा सेनेने उपस्थित केले आहेत. ‘भाजप हा आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन करीत आहे. तसेच आचारसंहिता सुरू असताना के. सी.महाविद्यालयाने राजकीय पक्ष व नेत्यांशी निगडित कार्यक्रम संकुलात करण्यासाठी परवानगी कशी दिली. या प्रकरणाबाबत कारवाई करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे प्रधान सचिव आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र दिले आहे’ , असे ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा…मुंबई : अंधेरीत २२ मे रोजी १६ तास पाणीपुरवठा बंद, आसपासच्या विभागांतील पाणीपुरवठाही खंडित होणार
भाजपच्या कार्यक्रमाशी आमचा संबंध नाही, फक्त सभागृह भाड्याने दिले
शैक्षणिक संकुलात राजकीय कार्यक्रम आणि राजकीय मंडळींचा हस्तक्षेप होऊ नये, या मताचे आम्ही आहोत. लोकसभा निवडणुकीच्या काळात अप्रत्यक्षरित्या कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार आणि राजकीय टीकाटिप्पणी होऊ नये म्हणून ‘इंडिया व्हिजन २०४७ आणि नेतृत्व’ या विषयावरील व्याख्यान आम्ही ठेवले नाही. विद्यार्थ्यांना नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील विविध संधींबाबत विस्तृत माहिती मिळावी, या उद्देशाने या क्षेत्रातील तज्ज्ञ ज्योतिरादित्य शिंदे यांचे व्याख्यान ठेवले होते आणि कोणतीही राजकीय वक्तव्ये करू नये, याबाबतही त्यांना कल्पना दिली होती. परंतु त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे हे व्याख्यान रद्द झाले. तसेच भाजपच्या ‘विशेष संपर्क अभियान’ या कार्यक्रमाशी आमचा काहीही संबंध नाही. या कार्यक्रमात आमच्या विद्यार्थ्यांचाही समावेश नाही. भाजपने के.सी. महाविद्यालयाचे सभागृह या कार्यक्रमासाठी भाड्याने घेतले होते. भाजपने त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर ‘वाटुमल सभागृह’ असे नमूद करणे अपेक्षित होते. पण त्यांनी ‘के.सी. महाविद्यालय’ सभागृह नमूद केले. हे सभागृह इतरही कार्यक्रमांना भाड्याने दिले जाते. – प्रा. हेमलता बागला, कुलगुरू, एचएसएनसी विद्यापीठ