मुंबई : मुंबईमधील वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनली असून, काही महिन्यांपूर्वी वायू प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत नोंदली गेली होती. मुंबईमधील हवेची गुणवत्ता सुधारावी यादृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. वायू प्रदूषणाबाबत १८ ते २५ वयोगटांतील तरुणांनी संबंधित यंत्रणांकडे सर्वाधिक तक्रारी केल्याचे एका सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे.

नागरिकांनी वायू प्रदूषणाबाबत मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई एअर अॅप आणि मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई मदत क्रमांकावर तक्रारी नोंदविल्या आहेत. पर्यावरणविषयक काम करणाऱ्या ‘वातावरण’ या संस्थेने या तक्रारींची दखल घेऊन यासंदर्भात एक सर्वेक्षण केले. वायू प्रदूषणाबाबत तक्रार करणाऱ्यांपैकी ६५.८ टक्के नागरिक १८ ते २५ वयोगटातील असून २६ ते ३५ वर्ष, ३६ ते ४५ वर्ष आणि ४६ ते ५५ वर्ष वयोगटातील प्रत्येकी ११ टक्के नागरिकांचा तक्रारदारांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा : मंत्रालयातील नोकरी घोटाळा : आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन

दरम्यान, सर्वेक्षण करताना १,३०० हून अधिक तक्रारींचे विश्लेषण करण्यात आले. तक्रारींमध्ये प्रामुख्याने धूळ कमी करण्याच्या नियमांचे उल्लंघन, उघड्यावर कचरा जाळणे आदींचा समावेश होता. एकूण तक्रारींपैकी ७२.७ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

Story img Loader