मुंबई : गेल्याच वर्षी ३० टक्के शुल्कवाढ केल्यानंतर यंदा पुन्हा मुंबईतील शालेय बसचे शुल्क १५ ते २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय ‘स्कूल बस असोसिएशन’ने घेतला आहे. त्यानुसार १ एप्रिलपासून शुल्कवाढ करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी असोसिएशनने शालेय बसच्या शुल्कात ३० टक्के वाढ केली होती. करोना कालावधीत भाडेवाढ करण्यात आली नाही, असे कारण देऊन थेट ३० टक्के शुल्क वाढवण्यात आले होते. यंदा पुन्हा २० टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. इंधन दरवाढ, बससंबंधीच्या साहित्याच्या वाढलेल्या किमतीमुळे महिन्याचे आर्थिक गणित जुळवताना नाकी नऊ येत असल्याचे ‘स्कूल बस असोसिएशन’ने’ म्हटले आहे. पंधरा वर्षांपेक्षा जुनी वाहने भंगारात काढण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. आता नवीन बसचे दरही वाढले आहेत, असे संघटनेचे म्हणणे आहे. आता नवीन बसची किंमत २८ लाख रुपये, तर मिनी बसची किंमत २१ लाख रुपये झाली आहे. तसेच सुट्टे भाग, बॅटरीचे दर १२ ते १८ टक्यांपर्यत वाढले आहेत. बस चालक व इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून शालेय बसची १५ ते २० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘स्कूल बस असोशिएशन’चे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.