मुंबई : शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी, तसेच अंतराळविषयक बाबींचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्राने अत्याधुनिक अशी बस सजवली आहे. या अद्ययावत बसमध्ये जोडण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनला स्पर्श करताच अंतराळातील ग्रह, तारे स्क्रीनवर दिसतील. येत्या २ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना या बसमधील गंमतीजमती अनुभवायला मिळतील. तसेच, या उपक्रमाअंतर्गत निवडक मुलांना नासा दौऱ्याचीही विशेष संधी दिली जाणार आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने नेहरू विज्ञान केंद्र आणि आयटीसी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बसमधील प्रदर्शन आणि प्रयोगशाळेत विज्ञान, खगोलशास्त्र अशा अनेक विषयांतील गंमती विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहेत.

तसेच विद्यार्थ्यांनी हाताने रेखाटलेल्या चित्रांची मूळ आकर्षकता कायम ठेवत डिजिटल कलाकृतींमध्ये ती करण्यात आली आहेत. चित्रे स्कॅन केल्यानंतर बसमधील स्क्रीनवर संबंधित चित्रे डिजिटल ‘थ्री डी इंटरॅक्टिव्ह कॅरेक्टर्स’मध्ये पाहता येतात. या बसला फँटसी स्पेसशिप हे नाव देण्यात आले असून आतापर्यंत या बसला ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला साद घालणाऱ्या या उपक्रमात निवडक मुलांना नासा दौऱ्याची विशेष संधी दिली जाणार आहे. जेणेकरून अंतराळ संशोधनाबाबत त्यांच्या मनात कुतूहल निर्माण होईल. सनफीस्ट डार्क फँटसी या संस्थेने हा कलात्मक उपक्रम राबविला असून विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येत आहे. यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादसह दक्षिण भारतातील अन्य शहरांमध्येही हा उपक्रम राबविण्यात आला होता.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीच्या कक्षा रुंदावण्यासाठी नेहरू विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अद्भुत सर्जनशीलतेची जाणीव झाली आहे. येत्या काळात अशा पद्धतीचे आणखी उपक्रम राबविले जातील, असे आयटीसी लिमिटेडच्या फूड्स डिव्हिजन, बिस्किट्स आणि केक्स क्लस्टरचे सीओओ अली हारिस शेर यांनी सांगितले.

एक पालक म्हणून मी नेहमीच मुलाच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतील अशा उपक्रमांचा शोध घेत असते. नेहरू विज्ञान केंद्रातील बसमधील हा अनुभव खरंच जादूई होता. विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा इतका सुंदर संगम मी याआधी कधी पाहिला नव्हता, अशी भावना एका विद्यार्थ्याच्या आईने व्यक्त केली.

Story img Loader