मुंबईः मुंबईत एका दिवसात अवघ्या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सखल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचले. परिणामी, काही रस्ते खरबडीत होण्याची, तर काही ठिकाणी खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पालिकेच्या २२७ प्रभागातील दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या क्षेत्रात स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे दौरे करून खड्डे शोधावेत आणि खड्डे छोट्या आकारांचे असतानाच ते भरावेत. पावसाची उघडीप मिळताच खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेत रस्ते सुस्थितीत ठेवावेत, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. तसेच, बघ्याची भूमिका न घेता प्रसंगी कारवाई करू, अशीही ताकीद त्यांनी दिली.
रस्ते वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्यासाठी तसेच खड्डेमुक्त रस्त्यांसाठी तातडीने उपाययोजना आखण्याबाबत अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पालिकेच्या दुय्यम अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात रस्त्यांवर उतरले पाहिजे. दुरुस्तीयोग्य रस्ते, खड्डे शोधले पाहिजेत. स्वत:हून खड्डे भरण्याची कार्यवाही पूर्ण केली पाहिजे. रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी महानगरपालिकेने यंत्रणा निर्माण केली आहे. जेणेकरून नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर व विनाव्यत्यय होईल. नागरिक, लोकप्रतिनिधी, माध्यमे आणि समाज माध्यमांद्वारे आलेल्या प्रत्येक तक्रारींचा विहीत मुदतीत निपटारा झालाच पाहिजे. महानगरपालिकेच्या विविध विभागांशी समन्वय साधून खड्डे भरण्याची कार्यवाही प्राधान्याने हाती घेतली पाहिजे. रस्ते दुरुस्ती कामामध्ये अभियंत्यांकडून तत्परता दिसली पाहिजे, जेणेकरून खड्डा निदर्शनास आल्यास अथवा निदर्शनास आणून दिल्यास २४ तासांत खड्डा भरला जाईल, असे स्पष्ट शब्दात बांगर यांनी यंत्रणांना बजावले.
हेही वाचा – वडाळा, ॲन्टॉप हिलमधील ८७ नवीन घरेही आगामी सोडतीत; अत्यल्प गटासाठी घरे
हेही वाचा – ‘कमला मिल’च्या रमेश गोवानी यांना अटक
रस्ते, मुख्य रस्ते त्याचबरोबर द्रुतगती महामार्गाच्या देखभाल – दुरुस्तीची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. मुंबई महानगरात कमी वेळेत जास्त पडणारा पाऊस, विविध प्रकारच्या वाहनांची वर्दळ, वाहतूक घनता, विविध उपयोगिता सेवावाहिन्यांसाठी खोदलेले चर या विविध कारणांमुळे रस्त्यांची हानी होते. सुलभ प्रवासासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून रस्त्यांची डागडूजी केली पाहिजे. रस्त्यांची चाळण झालेली, खड्ड्यात रस्ता अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. त्यावेळी प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्यासह इतर अभियंते, अधिकारी उपस्थित होते.