मुंबई : महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चौपाट्यांवर सुरक्षा रक्षक दलातील जवानांना तैनात केले असून चौपाट्यांवर जीवरक्षकांसोबत तीन पाळ्यांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात आहेत. मात्र, तेथे वीज, पाणी, शौचालय आदी मूलभूत सुविधा नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पालिकेने चौपाट्यांवर मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा व गोराई या चौपाट्यांवर जीवरक्षकांसोबत पालिकेच्या सुरक्षा रक्षक दलातील जवानांनाही तैनात केले आहे. पावसाळ्यात अनेक मुंबईकर कुटुंबासह चौपाट्यांवर फिरायला जातात. पावसाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणही चौपाट्यांवर जात असतात. यावेळी अनेकांना पोहण्याचा मोह आवरत नाही. मात्र, पोहताना अपघात होण्याची दाट शक्यता असते. तसेच, यापूर्वीही चौपाट्यांवर अनेक दुर्घटना घडून जीवितहानी झाली आहे. याच अनुषंगाने, चौपाट्यांवर होणाऱ्या अनुचित घटना टाळण्यासाठी पालिकेकडून जीरवक्षक व सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येते. यंदाही शहर आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रशिक्षण (सीडीआरएफ) देऊन अनेक चौपाट्यांवर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षा रक्षकांना मूलभूत सोयी – सुविधा मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
हेही वाचा – पावसात झाडांखाली थांबू नये, मुंबई महानगरपालिकेचे मुंबईकरांना आवाहन
या चौपाट्यांवर सुरक्षा रक्षकांना पिण्याचे पाणी, कपडे बदलण्यासाठी योग्य चौकी, शौचालय, वीज आदी सोयी उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेने सुरक्षा रक्षकांसाठी योग्य मूलभूत सोयी – सुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका उपायुक्त किशोर गांधी यांच्याकडे केली आहे.