लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अटक झाल्यापासून शिक्षा होईपर्यंतचा १२ वर्षांचा कारागृहात घावलेला कालावधी शिक्षेतून माफ करण्याची मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांशी संबंधित प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची मागणी विशेष टाडा न्यायालयाने शनिवारी मान्य केली.

सालेम याला २००५ मध्ये पोर्तुगाल सरकारने भारताच्या हवाली केले होते. त्यानंतर, सालेम याच्यावर मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी खटला चालवण्यात आला आणि २०१७ मध्ये विशेष टाडा न्ययालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सध्या तो नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

सालेम याने या प्रकरणातील अटकेच्या तारखेपासून ते त्याला शिक्षा सुनावली जाईपर्यंत म्हणजेच ११ नोव्हेंबर २००५ ते ७ सप्टेंबर २०१७ हा तुरूगांत घालवलेला १२ वर्षांचा कालावधी शिक्षेतून कमी करण्याची मागणी केली होती. त्याच्या अर्जावर विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी शनिवारी निर्णय देताना त्याची मागणी मान्य केली.

आणखी वाचा-दादर रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

बॉम्बस्फोट प्रकरणाव्यतिरिक्त बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणीही सालेम याला २०१५ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात त्याच्या अटकेपासून शिक्षा होईपर्यंतचा १० वर्षांचा कारागृहात घालवलेला कालावधी कारागृह प्रशासनाने माफ केला होता. तथापि, साखळी बॉम्बस्फोट खटल्यात त्याला अटकेपासून शिक्षा होईपर्यंत कारागृहात घालवलेला कालावधी माफ करण्यात आला नव्हता. असे करून विशेष न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्यात आल्याचा दावा सालेम याने शिक्षेतून हा कालावधी माफ करण्याची मागणी करताना केला होता. विशेष न्यायालयाने हा कालावधी माफ करण्याचे आदेशात नमूद केल्याचा दाखला त्याने त्यासाठी दिला होता. त्याचप्रमाणे, एका प्रकरणात हा कालावधी माफ केला जातो, तर दुसऱ्या प्रकरणात त्याचा विचार केला जात नाही हे अनाकलनीय असल्याचेही सालेम याने अर्जात म्हटले होते.

आणखी वाचा-मुंबईत सोमवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

विशेष टाडा न्यायालयाने दोन्ही प्रकरणात आपल्याला झालेली शिक्षा एकत्र भोगण्याचे स्पष्ट केले होते. याव्यतिरिक्त, आपल्या प्रत्यापर्णाविषयी भारत आणि पोर्तुगाल सरकार यांच्यात झालेल्या करारात आपल्यावर अतिरिक्त गुन्हे चालवले जाणार नसल्याचे मान्य करण्यात आले होते. शिवाय, आपल्यावर चालवण्यात आलेल्या गुन्ह्यांत आपण दोषी ठरल्यास २५ वर्षांहून अधिक काळ शिक्षा सुनावली जाणार नाही, अशी अट घालण्यात आल्याचेही सालेम यांने अर्जात नमूद केले होते. पोर्तुगीज कायद्यानुसार आपण माफीसाठी पात्र असल्याचा दावाही सालेम याने केला होता. कारागृह प्रशासनाने हा कालावधी शिक्षेतून माफ करण्यास नकार दिल्यानंतर सालेम याने न्यायालयात अर्ज केला होता. तो विशेष टाडा न्यायालयाने योग्य मान्य केला.