मुंबई : गेल्या महिन्यात कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्टच्या भीषण अपघातातील प्रमुख आरोपी आणि बसचालक संजय मोरे याने जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. आपण निर्दोष असून बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा करून मोरेने जामिनाच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश सचिन पवार यांनी शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देताना तो फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मोरे याच्या जामीन अर्जावर शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

दरम्यान, न्यायवैद्यक अहवाल आणि आरटीओचा अहवालाचा दाखला देऊन मोरे हा घटनेच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत नव्हता. तसेच, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. त्यामुळे, मोरे याच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा दावा करून पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. मोरे हा चांगला चालक नसून त्याच्यापासून धोका आहे. त्यामुळेच, त्याला जामीन मंजूर करू नये. तसेच, जामिनावर सुटका झाल्यास तो पळून जाण्याची शक्यता असल्याचा दावाही पोलिसांनी मोरे याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करताना केला होता.

हे ही वाचा… बदलापूर – खोपोली लोकल बंद, कर्जत येथे रविवारी वाहतूक ब्लॉक

हे ही वाचा… मुंबई महानगरपालिकेकडून औषध वितरकांची १२० कोटींची देयके थकीत, देयके मंजूर न झाल्यास १३ जानेवारीपासून पुरवठा बंद करण्याचा इशारा

दुसरीकडे, आपल्याला १९८९ पासून बस चालविण्याचा अनुभव आहे आणि विद्युत बसमध्ये यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. किंबहुना, या अपघाताला जबाबदार असलेल्या प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी आपला बळी दिला जात असल्याचा दावा मोरे याच्या वतीने युक्तिवादाच्या वेळी करण्यात आला होता. या प्रकरणात कोणत्याही बस कंत्राटदाराला अटक करण्यात आलेली नाही किंवा आरोपी करण्यात आलेले नाही. आपल्याला कार्यालयात बसून वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि दिंडोशी बस आगारात विद्युत बस चालविण्यास सांगितले. त्यानंतर, आपल्याला कुर्ला येथे बस चालविण्यास परवानगी देण्यात आली. तसेच, या दुर्घटनेसाठी आपल्या एकट्याला जबाबदार धरता येणार नसल्याचा पुनरूच्चार करून आपल्याला जामीन मंजूर करण्याची मागणी मोरे याच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली होती.

Story img Loader