पर्यटन विभागाकडून रात्र पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न

नमिता धुरी

मुंबई : ब्रिटिशकालीन इमारती, चौपाटी, वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती इत्यादी कारणांमुळे मुंबई हा जगभरातील पर्यटकांचा आकर्षणिबदू आहे. त्यामुळे दिवसाबरोबरच रात्री खुलणाऱ्या मुंबईच्या सौंदर्याचा अनुभव पर्यटकांना घेता यावा, यासाठी रात्र पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न पर्यटन विभाग करत आहे.

 या रात्रीच्या मुंबापुरीचा आस्वाद घेता यावा यासाठी कौशल्यपूर्ण रचना असलेल्या काही महत्त्वाच्या इमारतींचे प्रकाश प्रदीपन केले जाणार आहे. त्यामध्ये उच्च न्यायालयाची इमारत, त्याच्या बाजूलाच असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत, दिवाणी न्यायालय, एल्फिन्स्टन इन्स्टिटय़ूट, महापालिका मुख्यालयाच्या शेजारील महानगर दंडाधिकारी न्यायालय, पोलीस महासंचालन इमारत, रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, मुंबई विद्यापीठाचे पदवीदान सभागृह, गेट वे ऑफ इंडिया, टपाल खात्याचे मुख्यालय यांचा समावेश आहे. आठवडय़ाअखेरीस ४ तास आणि एरव्ही २ तास असे हे प्रकाश प्रदीपन केले जाणार असून त्यावर ५ वर्षांसाठी ३० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबईत येणारे पर्यटक कलाकुसरीच्या विविध वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ यांची खरेदी करतात. त्यांना खरेदीसाठी उपयुक्त ठिकाणांची माहिती व्हावी यासाठी समाजमाध्यमांचा आधार घेतला जाणार आहे. ‘महात्मा जोतिबा फुले मंडई’ म्हणजेच क्रॉफर्ड मार्केट, कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेले बाजार, मनीष मार्केट, इत्यादी बाजारपेठांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी दृकश्राव्य फिती तयार केल्या जाणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत दरवर्षी हजारो आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. ते विविध वाहनांनी प्रवास करतात, वस्तूंची खरेदी करतात, हॉटेलमध्ये वास्तव्य करतात. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिकांच्या रोजगारातही वाढ होते. वाढणाऱ्या आर्थिक उलाढालीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीतही भर पडण्याची आशा आहे, असे पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी सांगितले.