Mumbai Shivneri Bus Accident : मुंबईतील कुर्ला येथे बेस्टच्या बसने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसने मुंबईतील प्रभादेवी भागात तिघांना धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. बुधवारी मध्यरात्री २.३० वाजता प्रभादेवी पुलावर ही घटना घडली.
प्रणय बोडके (२९), करण शिंदे (२९) आणि दुर्वेश गोरडे हे तिघे दुचाकीवरून दादरच्या फुल बाजराता फुले आणण्यासाठी जात होते. होळीच्या पूजेसाठी त्यांना फुलं हवी होती. त्याचवेळी प्रभादेवी पुलावर समोरून शिवनेरी बस चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आली. या बसने प्रणयच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर स्थानिकांनी या तिघांना केईएम रुग्णालयात नेलं. प्रणयचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर, दुर्वेश व करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दरम्यान, बस चालक इक्बाल शेख याला अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर स्थानिकांनीच त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं. या अपघातात प्रणय बोडके या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रणयच्या मागे त्याची पत्नी, आई, वडील व दीड वर्षांचा मुलगा असं कुटुंब आहे. प्रणय हा त्याच्या घरातील एकटाच कमावणारा होता. त्याचं कुटुंब काळाचौकी येथील ऐक्यदर्शन सोसायटी येथे वास्तव्यास आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या सोशल मीडिया विभागात काम करत होता.
कुर्ल्यातील अपघाताची पुनरावृत्ती?
कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयासमोर १ डिसेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास भीषण अपघात झाला होता. भरधाव वेगात धावणाऱ्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक पादचारी व वाहनांना धडक दिली होती. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले होते, तर एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्या इलेक्ट्रिक बसचा चालक हा बेस्टचा कंत्राटी कर्मचारी होता, जो सध्या अटकेत आहे. दुसऱ्या बाजूला प्रभादेवीमध्ये देखील एसटीच्या (शिवनेरी) इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक बस व या बस चालवण्याच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.