मुंबई : सायबर फसवणुकीत पूर्वी नायजेरीयन टोळ्याची मक्तेदारी होती. मात्र आता भारतात अनेक ठिकाणी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक टोळ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर फसवणुकीसाठी कुख्यात जामताराच्या धर्तीवर देशात अनेक ठिकाणी अशा सराईत टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. फसवणुकीची रक्कम रोखीमध्ये काढून ती विविध व्यवसाय व मालमत्तांमध्ये गुंतवली जात आहे. गेल्यावर्षी एकट्या मुंबईत १२०० कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे.
शेअर मार्केट गुंतवणूक, टास्क फसवणूक व डिजिटल अरेस्ट यांसारख्या नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नोव्हेंबरपर्यंत ५५ हजार तक्रारदारांनी सायबर फसणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. त्यात अगदी सनदी लेखापाल (सीए), निवृत्त बँक अधिकारी, डॉक्टर आदी उच्चशिक्षित व्यक्तींचाही समावेश आहे. सायबर फसवणूक करणारे सामान्य नागरिकांची जन्मभराच्या कमाईवर लुटत आहेत. गेल्यावर्षी याच काळात मुंबईत केवळ २६२ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. यावर्षी प्रथमच मुंबईतील सायबर फसवणुकीची रक्कम हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुंबईत ११८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. मुंबईतील नागरिकांची सायबर फसवणुकीची रक्कम तात्काळ वाचवण्यात मदत व्हावी, यासाठी मुंबई पोलिसांनी १९३० हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. सायबर फसवणुकीप्रकरणी या हेल्पलाईन क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींच्या दूरध्वनींमध्येही प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या वर्षीय या हेल्पाईनवर पाच लाखांहून अधिक तक्रारीचे दूरध्वनी आले. गेल्यावर्षी याच कालावधीत या हेल्पलाईनवर सुमारे ९१ हजार दूरध्वनी आले होते.
मुंबईत यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत ५५ हजार ७०७ जणांनी सायबर फसवणूक झाल्याची तक्रार केली असून या प्रकरणांमध्ये ११८१ कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. त्यातील केवळ १२ टक्के म्हणजे १३९ कोटी १५ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १८ हजार २५६ जणांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची २६२ कोटी ५१ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली होती. त्यातील केवळ १० टक्के म्हणजे २६ कोटी ५२ लाख रुपये परत मिळवण्यात पोलिसांना यश आले होते.
हेही वाचा…वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करून सव्वा कोटींची सायबर फसवणूक
साबयर फसवणुकीत पूर्वी नायजेरियन नागरिकांच्या टोळ्या सक्रिय होत्या. पण आता राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमधील सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय शहरांमध्ये परदेशी नागरिकांची सायबर फसवणूक करणारे मदत सेवा केंद्र (कॉल सेंटर) कार्यरत असल्याचे यापूर्वी काही प्रकरणांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून उघडकील आले आहे. हे गुन्हे आता सराईतपणे केली जात आहेत. त्यात नागरिकांची गोपनीय माहिती चोरणाऱ्या अथवा मिळवणाऱ्या टोळ्याही कार्यरत आहेत. त्यांच्याकडून डेटा मिळवून अथवा जाहिरातीद्वारे फसवणूक करण्यात येत आहे. विशेष करून मोबाइल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे व्यवहारांमध्ये नफा झाल्याचे आभासी चित्र उभे केले जाते. तोपर्यंत ही रक्कम विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाते. अशी बँक खाती असणाऱ्या टोळ्याही कार्यरत आहेत. त्या बनावट कागदपत्रांद्वारे अशी खाती उघडण्यात येतात. अथवा एखाद्या व्यक्तीच्या बँक खाते कमिशन देऊन वापरण्यात येते. ही रक्कम अगदी परराज्यांसह परदेशातूनही काढण्यात येत आहे. परदेशात काढलेली रक्कम हवाला अथवा कूट चलनात गुंतवली जाते. पुढे ती रक्कम मालमत्तांमध्ये गुंतवण्यात येते. माटुंगा पोलिसांनी एका टोळीला अटक केली होती. त्यांच्या बँक खात्यात ६० कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. त्यामुळे आरोपींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ती रक्कम ५० बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी गेल्यावर्षी सायबर फसवणुकीप्रकरणी अटक केलेल्या एका आरोपीने त्याच्या गावी ५ कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती. आरोपी सराईत झाल्यामुळे मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणे फार कठीण होऊन बसले आहे. त्याच्याशी संबंधित ६५०० अवैध सीमकार्ड पोलिसांनी बंद केली आहेत. पण नागरिकांमध्ये जागरूकता कमी असल्यामुळे भीती व लोभ याचा फायदा घेऊन नवनवीन कार्यपद्धतीद्वारे सायबर फसवणूक सुरूच आहे.