मुंबई महापालिकेने कुर्ला येथील हनुमाननगर भागात शौचालयाच्या नाल्याच्या कामासाठी खोदलेल्या खड़्ड्यात पडून एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ११.३० च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदाराने कामात हलगर्जी केल्याचा आरोप होत आहे.
मुंबई महापालिकेने कुर्ला पश्चिमेकडील हनुमाननगर भागात सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी काही दिवसांपूर्वी खड्डा खोदला आहे. या खड्ड्याभोवती सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. आज सकाळच्या सुमारास मोहम्मद अली हा सहा वर्षांचा मुलगा याठिकाणी खेळत होता. खेळत असतानाच मोहम्मद या खड्ड्यात पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पालिकेने शौचालयाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्याभोवती सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. खड्डा खोदल्यानंतर त्याभोवती बॅरिकेट्स लावणे गरजेचे होते. मात्र, संबंधित कंत्राटदाराने ते लावले नव्हते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच लहानग्या मोहम्मदचा मृत्यू झाला, असे सांगून स्थानिकांनी महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत, अशी माहिती आहे.