मुंबई : मुंबईतील झोपडीधारकांची पात्रता निश्चिती पारदर्शकपणे आणि योग्य प्रकारे व्हावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे झोपड्यांचे ड्रोन आणि झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येत आहे. एकूण १३ लाख ८९ हजार ०८६ झोपडीधारकांपैकी ५ लाख ४४ हजार ६३५ झोपडीधारकांचे २८ जानेवारी २०२५ पर्यंत बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित ८ लाख ३४ हजार ५५१ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण व्हायचे आहे. या झोपडीधारकांच्या सर्वेक्षणाचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान झोपु प्राधिकरणासमोर आहे. ही बाब लक्षात घेऊन प्राधिकरणाने बायोमेट्रीक सर्वेक्षणाला वेग दिला असून या कामासाठी मनुष्यबळात मोठी वाढ करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी झोपड्यांची आणि झोपडीधारकांची पात्रता निश्चिती करणे आवश्यक आहे. त्यानुसार झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. तसेच झोपडीधारकांनी जमा केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्रता निश्चिती करण्यात येते. परिशिष्ट -२ प्रसिद्ध केले जाते आणि यातील झोपडीधारक योजनेसाठी पात्र ठरतात. असे असताना झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीबाबत अनेक तक्रारी येत असून या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे. बनावट कागदपत्रांद्वारे झोपु योजनेतील घरे लाटण्याचा प्रयत्न होतो. बनावट कागदपत्राद्वारे घरे लाटण्याच्या प्रकारला आळा घालण्यासह पात्रता निश्चितीची प्रक्रिया १०० टक्के पारदर्शक करण्यासाठी झोपु प्राधिकरणाने झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. तीन खासगी संस्थांच्या माध्यमातून २०१६ मध्ये या कामाला सुरुवात करण्यात आली. २०२१ नंतर नव्याने तीन खासगी संस्थांची नियुक्ती करून बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू ठेवण्यात आले. २०१६ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत १३ लाख ८९ हजार ०८६ पैकी ५ लाख ४४ हजार ६३५ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बोयोमेट्रीक सर्वेक्षणाला २०१६ मध्ये सुरुवात झाली, मात्र त्याचा वेग कमी होता. मागील काही वर्षांपासून सर्वेक्षणाला वेग देण्यात आला. त्यामुळेच आतापर्यंत ५ लाखांहून अधिक झोपडीधारकांचे बायोमेट्रीक पूर्ण करण्यात यश आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आता ८ लाख ३४ हजार ५५१ झोपडीधारकांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण शिल्लक आहे. ही संख्या प्रचंड आहे आणि १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत ३१ मार्चपर्यंत या सर्व झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी तिन्ही खासगी संस्थांच्या मनुष्यबळात वाढ करून सर्वेक्षणाच्या कामला वेग देण्यात आला आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत सर्व झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण होईल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

काही ठिकाणी सर्वेक्षणाला विरोध

झोपु प्राधिकरणाकडून करण्यात येत असलेल्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला काही ठिकाणचे झोपडीधारक विरोध करीत आहेत. खासगी विकासकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात असल्याच्या गैरसमजातून हा विरोध होत आहे. हा गैरसमज दूर करून सर्वेक्षण वेगाने पूर्ण करता यावे यासाठी झोपु प्राधिकरणाने लवकरच वर्तमानपत्रात एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. बायोमेट्रीक सर्वेक्षण राज्य सरकार, झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यात खासगी विकासकांचा सहभाग नाही. हे सर्वेक्षण पात्रता निश्चितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला झोपडीधारकांनी योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन या जाहीर निवेदनाद्वारे झोपडीधारकांना करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai slum rehabilitation authority is using drones and biometrics to ensure transparent eligibility of slum dwellers mumbai print news sud 02