मुंबई: अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक जातीचे नागरिक धारावी मतदार संघात राहत असले, तरी धारावी पुनर्विकासाच्या मुद्दा त्या सर्वांनाच जोडणारा आहे. याशिवाय आरोग्य व स्वच्छतेचा अभाव परिसरात दिसतो. त्याची धग करोना काळात पहायला मिळाली होती. मुंबईच्या मध्यवर्ती भागात जवळपास ६०० एकरवरती धारावीची झोपडपट्टी वसलेली आहे. धारावीतल्या ६० हजारांहून अधिक झोपड्यांमध्ये १० लाखाहून अधिक लोक राहतात. शिवाय, १३ हजाराहून अधिक लघु उद्याोग धारावीत आहेत. धारावी परिसरात छोटी, मध्यम व मोठी अशा घऱांमध्ये राहणारे नागरिक आहेत आहेत, तसेच लघु उद्याोगही मोठ्याप्रमाणात चालतात. या सर्वांनाच पुर्विकासात त्यांच्या जागेपेक्षा अधिक जागा अपेक्षीत असल्यामुळे हा सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे.
हेही वाचा : ‘नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं’, मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे?
धारावी पुनर्विकासात रहिवाशांनी ५०० चौरस फुटाची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. तसेच झोपडपट्टी वासियांनाही त्याच परिसरात घर मिळावे अशीही मागणी आहे. याशिवाय परिसरातील लघु उद्याोगाशी संबंधीतही अनेक समस्या आहेत. चामड्यापासून विविध वस्तू बनवण्याची मोठी बाजारपेठ धारावीत आहे. याशिवाय कुंभारवाड्यातील व्यवसाय, कापड उद्याोग, जरीकाम, शिवणकामाशी संबंधीत व्यवसाय, भंगार, प्लॅस्टिक वस्तू, सजावटीच्या वस्तू, खाण्याच्या पदार्थांच्या निर्मितीचे व्यवसाय या परिसरात मोठ्याप्रमाणात चालतात. या व्यवसायांबाबत अनेक समस्या आहेत. पुनर्विकासात त्यांना कोठे स्थान मिळते, याबाबतही त्यांच्यात संभ्रम आहे. धारावीच्या पुनर्विकासात केवळ झोपड्यांचा पुनर्विकास हाच कळीचा मुद्दा नाही. लघु उद्याोग, असंघिटत, संघटित कामगार आणि विविध जाती, धर्माचे समुदाय अशा सगळ्यांच्या सहमतीने, त्यांना सोबत घेऊन हा प्रकल्प राबवण्याची मागणी आहे.
संसर्गजन्य रोगांचा विळखा
● धारावीत आरोग्याची समस्याही गंभीर आहे. त्याची दाहकता करोना काळात पहायला मिळाली. संसर्गजन्य आजार धारावीत वेगाने पसरतात. तसेच महिला आणि बालकांना आहारातून पुरेस पोषण मिळत नसल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याचे त्यावेळी आढळले होते.
● आजही परिसरात टीबी सारख्या गंभीर आजारांचे प्रमाण अधिक आहे. दाटीवाटीची वस्ती असल्यामुळे सार्वजनिक शौचालये संख्या व स्वच्छता याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाणी पुरवठ्याबाबतही नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. याशिवाय अस्वच्छता व प्रदुषणाचा प्रश्नही गंभीर आहे.