मंबई : अणुशक्ती नगर परिसरात झोपडपट्ट्या, उच्चभ्रूंच्या इमारती, सरकारी वसाहती अशी संमिश्र वस्ती आहे. बीपीसीएल, ‘आयपीसीएल’चे कर्मचारी, रहेजा कॉम्प्लेक्ससारख्या उच्च मध्यमवर्गीयांच्या वसाहती, तर दुसरीकडे मानखूर्द गाव, देवनार, चिता कॅम्पसारख्या दाटीवाटीच्या वस्ती आहेत. या विभागातील नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. गर्दी आणि कोंदट वातावरण, दुर्गंधी, प्रदूषण आदी त्याला कारणीभूत ठरत आहे. या परिसरात अनेक वस्त्यांमध्ये अरुंद रस्ते असल्याने वाहतूक कोंडी ही कायमची समस्या ठरली आहे.
या परिसरात औष्णिक वीज प्रकल्प, तेल शुद्धीकरण प्रकल्प व भाभा अणु संशोधन केंद्र आहे. या परिसरात नीटनेटकेपणा पाहायला मिळत असताना दुसरीकडे देवनार, मानखुर्द, चिता कॅम्प परिसरात दाटीवाटीच्या वस्त्या निदर्शनास येतात. झोपडपट्टींमुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. प्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत.
हेही वाचा : भरदिवसा जुहू चौपाटीवर बलात्कार करणे अविश्वनीय, आरोपीला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
मानखुर्द कचराभूमी लगतच्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. अस्वच्छता आणि दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपड्या त्याचे प्रमुख कारण आहे. कोंदट वातावरणामुळे क्षयरोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक ठिकाणी उघडी, गटारे अधूनमधून लागणाऱ्या आगींमुळे रहिवाशांचा जीव घुसमटत आहे.
अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. शिवाय घाणीच्या साम्राज्यामुळे डेंगू, हिवतापाचा फेराही पडत आहे. दाटीवाटीने वस्ती असलेल्या परिसरात आरोग्य सेवा अपुरी आहे. परिसरात तोतया डॉक्टरांचे प्रमाणही अधिक आहे. गंभीर आजारांसाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात शीव आणि शताब्दी रुग्णालयांवर अवलंबून आहेत. वाहतूक कोंडी, दूरवर असलेले रुग्णालय यामुळे तेथे पोहोचेपर्यंत अनेकांना रस्त्यात जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी येथे घडल्या आहेत.
हेही वाचा : आवश्यक मंजुरी न मिळाल्यास मोक्का लागू नाही, आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन मागण्याचा अधिकार
आरोग्यसुविधा, शाळांचा अभाव
● शहरातील अनेक प्रकल्पग्रस्तांचे याच परिसरात पुनर्वसन करण्यात आले. मात्र आवश्यक इतर सोयी – सुविधांपासून ते वंचित आहेत. त्यामुळे पुनर्वसित वस्त्यांमधील रहिवाशांसाठी दवाखाने, शाळा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध न झाल्याची मोठी ओरड आहे.
● सारख्या झोपडपट्टीत गटरांची समस्या फार गंभीर आहेत. अनेक वस्त्यांमध्ये उघडी गटारे आहेत. त्यांच्यावर झाकण बसविण्याचे काम बऱ्यापैकी झाले आहे. पण त्यानंतर अनेक गटारांची झाकणे तुटल्याने यापूर्वी त्यात लहान मुले आणि वृद्ध पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
● पाण्याचा प्रश्नही नागरिकांचा सतावत आहे. अनधिकृत बांधकामामुळे व्यवस्थेवरही ताण प्रचंड वाढला आहे. त्यातच परिसरात अनेक महत्त्वाचे रस्ते जोडले गेल्यामुळे गेल्या काही वर्षांत वाहतूक कोंडीचा प्रश्नही जटील बनला आहे.