मुंबई : स्वच्छ आणि सुंदर शहरासह मुंबईकर निरोगी राहावेत, या हेतूने महानगरपालिका प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देत शासकीय, महानगरपालिका आणि खासगी रूग्णालयांमध्येही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासांच्या कालावधीत राबवलेल्या मोहिमेतून तब्बल ५६० मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, ५५४ मेट्रिक टन राडारोडा आणि २२५ टाकाऊ वस्तूही गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. महापालिकेने सुमारे ६१५ विविध अद्ययावत यंत्रे आणि १५ हजार मनुष्यबळाच्या साहाय्याने ही मोहीम पूर्ण केली.

मुंबईत ढासळत चाललेला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी महानगरपालिका विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवत असते. त्याचाच भाग म्हणून डिसेंबर २०२३ महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत या मोहिमेच्या माध्यमातून मुंबईतील रस्ते, बेवारस वाहनांची विल्हेवाट, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान व क्रीडांगणांची स्वच्छता, राडारोडामुक्त परिसर, रस्ते धुणे आदी कामे केली जात आहेत. शून्य कचरा मोहीम, विशेष स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर पालिकेने रुग्णालयांमधील स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रामुख्याने रुग्णालये व आसपासचा परिसर, लगतचे पदपथ, वाहनतळ आदींची स्वच्छता करण्यात आली. घनकच-यासमवेतच राडारोड्याचेही संकलन करण्यात आले. स्वच्छता मोहिमेदरम्यान झाडलोट, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, बेवारस साहित्याची विल्हेवाट, कचरा संकलन, पाणी फवारणी करून स्वच्छता, पार्क केलेल्या वाहनांखालील कच-याची स्वच्छता, वाढलेली झाडेझुडपे, बेकायदेशीर जाहिरात फलक आणि टाकाऊ वस्तू हटविण्यात आल्या. ३ ते १९ मार्च या कालावधीत राबवलेल्या या मोहिमेतून तब्बल ५६० मेट्रिक टन कचरा आणि ५५४ मेट्रिक टन राडारोड्याचे संकलन करण्यात आले. यासाठी सुमारे ५० पाण्याचे टँकर्स वापरण्यात आले. महापालिकेने जवळपास १५ हजार मनुष्यबळाच्या साहाय्याने विविध रुग्णालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने आता पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

कोणकोणत्या रुग्णालयांत स्वच्छता?

कामा व आल्बेस रूग्णालय, नागपाडा पोलिस रूग्णालय, महानगरपालिकेचे शीव (सायन) रूग्णालय, राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रूग्णालय, व्ही. एन. देसाई रूग्णालय, एस. के. पाटील रूग्णालय, चोक्सी प्रसूतिगृह, टोपीवाला प्रसूतिगृह, भाभा रूग्णालय (कुर्ला), शताब्दी रूग्णालय, दिवालीबेन मेहता रूग्णालय, राजावाडी रूग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय, के. सी. एल. भन्साळी प्रसूतिगृह, साबूसिद्दीक रूग्णालय, सैफी रूग्णालय, लाईफ केअर रूग्णालय, माहीम प्रसूतिगृह, नानावटी रूग्णालय, एस.जे.डी.सी. प्रसूतिगृह आदी विविध रुग्णालये आणि आसपासच्या परिसरात व्यापक स्वरूपात स्वच्छता करण्यात आली.