मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील चालक, वाहकाने मद्यपान केलेले नाही याची खातरजमा करूनच त्यांना कर्तव्यावर पाठवणे गरजेचे आहे. मात्र, या नियमाची विभाग पातळीवर प्रभावी अंमलबजावणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एसटीच्या चालक, वाहकाने मद्यप्राशन केलेले नाही याची तपासणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. चालक, वाहकाने मद्यपान केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.
एसटी महामंडळाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकाने कर्तव्यावर जाणाऱ्या चालक, वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करूनच त्यांना कर्तव्यावर पाठविणे बंधनकारक आहे. त्यामुळे विभागातील संशयीत मद्यप्राशन करणाऱ्या चालक, वाहकांची तपासणी करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. यासंदर्भात १६ ते २० जानेवारी या कालावधीत सखोल तपासणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा…मध्य रेल्वेच्या १२ रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’
ही तपासणी सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक, प्रशिक्षण पर्यवेक्षक याच्यांमार्फत करण्यात येणार आहे. यासाठी अल्कोटेस्ट/ ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यात येणार आहे. विशेषतः मुक्कामी असणाऱ्या चालक, वाहकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच या मोहिमेदरम्यान तपासलेल्या सर्व चालक, वाहकांच्या नोंदी घेण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने दिली. तसेच एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकाकडून राज्यातील विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत.
विभाग नियंत्रकांना दिल्या या सूचना
विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी विभागातील संभाव्य मद्यपान करणारे चालक, वाहकांची गोपनीय पद्धतीने तपासणी करावी.
अल्कोटेस्ट यंत्राद्वारे तपासणी करावी.
विभागातील सर्व मार्गांवर तपासणी पथके, वाहतूक निरीक्षक चालक प्रशिक्षण व सुरक्षा व दक्षता विभागातील पर्यवेक्षकांनी तपासणी करावी.
बसस्थानकांवरील वाहतूक नियंत्रण कक्षातील वाहतूक नियंत्रकांनी लॉगशीटची नोंद करताना चालकाने मद्यप्राशन केलेले नाही याची खातरजमा करावी.