मुंबई : सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू परस्परांना जोडणारा बहुप्रतिक्षित तुळई अखेर बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान वरळीत दाखल झाली. प्रतिकूल हवामान स्थितीमुळे तुळई वरळीत आणण्याचे काम रखडले होते. मात्र, अखेर ही तुळई वरळीत दाखल झाल्यामुळे सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू जोडणीच्या कामाला वेग मिळणार आहे.

सागरी किनारा मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्यात येणारी २ हजार मेट्रिक टन वजनाची ही तुळई ६ एप्रिललाच पाठविण्याची तयारी झाली होती. मात्र, समुद्रातील प्रतिकूल हवामान स्थितीमुळे तुळई आणण्याचे नियोजन लांबणीवर पडले. अनुकूल वातावरण लक्षात घेऊन बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास न्हावा बंदरातून बार्जच्या साहाय्याने तुळई वरळीच्या दिशेने मार्गस्थ झाली. रात्री ८ वाजता समुद्रात उसळलेल्या लाटांमुळे काही वेळ कुलाब्यात प्रवास थांबविण्यात आला. समुद्र शांत झाल्यानंतर काहीच वेळाने तुळई वरळीत दाखल झाली. या तुळईचे वजन १७०० टन असून, १३६ मीटर लांब व ३६ मीटर उंच आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प असे नाव या प्रकल्पाला देण्यात आले असून या प्रकल्पाची वरळी – मरिन ड्राईव्हपर्यंतची मार्गिका नुकतीच वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. हा मार्ग वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकाला जोडण्यासाठी वरळी परिसरात समुद्रात पूल उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा – कोकण मार्गावरील ‘वंदे भारत’, ‘तेजस’ रद्द? ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर रेल्वेगाड्या रद्द असल्याचा संदेश

हेही वाचा – पार्किंगबाबत विकासकाने माहिती देणे बंधनकारक! महारेराकडून नवे आदेश

या पुलाच्या दोन खांबामधील अंतर वाढवावे यासाठी वरळीतील मच्छिमारांनी समुद्रातील प्रकल्पाचे काम अनेक महिने रोखले होते. त्यामुळे सागरी मार्ग आणि सागरी सेतू परस्परांना जोडण्याचे काम रखडले होते. त्यामुळे सध्या केवळ वरळीपासूनचा मार्ग सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर वरळीतील पुलाच्या दोन खांबांमधील अंतराचा मुद्दा मिटला आणि पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार, आता न्हावा बंदरातून ६० किमीचे समुद्री अंतर पार करून पुलाचे गर्डर वरळीत आणण्यात आले आहे. पुढील टप्प्यात दुसऱ्या बाजूचीही तुळई बसवली जाणार आहे. दोन्ही तुळई बसवल्यानंतर सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतू यांना जोडण्याचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने ठेवले आहे.

Story img Loader