मुंबई : स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन या सणांना जोडून आलेल्या सलग सुट्टीमुळे अनेकांनी एसटीने बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. मात्र एसटी कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात असून एसटी सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच आंदोलन लांबल्यास गणेशोत्सवानिमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांचेही हाल होण्याची चिन्हे आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच, मागील वेतन वाढतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकीत रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे आदी विविध मागण्यांसाठी सर्व एसटी कर्मचारी संघटना एकत्र येऊन आंदोलनाच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती सोबत बुधवारी बैठक बोलावली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याबरोबर एसटी कामगारांना वेतनवाढी संदर्भात ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व एसटी कर्मचाऱ्यांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ९ ऑगस्टपासून सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा : Mumbai Crime: दादरच्या ‘सूटकेस मर्डर’ची इनसाईड स्टोरी, “आरोपी मूक बधिर, टॅक्सीने आले आणि…”
गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ४,३०० विशेष जादा एसटी बस सोडण्यात आल्या आहेत. तसेच सणासुदीनिमित्त अनेकांनी गावी जाण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील ६५ लाख प्रवासी एसटी सेवेवर अवलंबून आहेत. जर, कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू झाले तर प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना गृहीत धरून सरकार वारंवार केवळ आश्वासने देते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बुधवारी महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीची बैठक आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला तर, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे हाल होण्यापासून वाचविता येतील.
संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना