मुंबई : मुद्रांक खरेदीसाठी वैयक्तिक उपस्थित राहण्याची अट रद्द करण्याकरिता नियमात बदल करावा लागणार आहे. सरकारने याबाबत आश्वासन दिल्यानंतर मुंबईतील मुद्रांक विक्रेत्यांचा गेले आठवडाभर सुरू असलेला संप सोमवारी मागे घेण्यात आला.
मुद्रांक खरेदीसाठी व्यक्तिगत हजेरीची सक्ती करणारे परिपत्रक मागे घ्यावे, या मागणीसाठी खासगी मुद्रांक विक्रेत्यांच्या संघटनेने संप पुकारला होता. मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर बहिष्कार मागे घेत दुपारनंतर मुंबईत विक्रेत्यांनी मुद्रांक विक्री सुरू केली. मुंबई येथील अपर मुद्रांक कार्यालयाचे नियंत्रक सतीश देशमुख यांनी २१ फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक काढले होते. यानुसार मुद्रांक खरेदी करण्यासाठी वैयक्तिक उपस्थित राहून नोंदवहीत स्वाक्षरी करण्याचे सक्तीचे करण्यात आले होते. यामुळे वृद्ध नागरिक, दिव्यांग अथवा आजारी व्यक्तींना हा नियम जाचक ठरत होता. याच कार्यालयाने ७ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये मुंबई आणि उपनगर या दोन जिल्ह्यांत मुद्रांक तुटवडा भासू नये म्हणून इतर जिल्ह्यांतील नागरिकांना येथे मुद्रांक खरेदी करण्यास मज्जाव केला होता. हे दोन नियम रद्द करावेत म्हणून विक्रेत्यांनी संप सुरू केला होता.
नागरिकांनी उपस्थित राहून नोंदवहित सही करून खरेदी करावी लागणारे परिपत्रक नोंदणी व मुद्रांक कार्यालयाने मागे घेतले नाही. परिपत्रक मागे घेण्याचे लेखी निवेदन संघटनेच्यावतीने मंत्रालयात मुद्रांक नोंदणी व शुल्क विभागाचे उपसचिव सत्यनारायण बजाज यांना दिले. यावर सरकारच्या वतीने सकारात्मक भूमिका घेण्यात आली असून नियमात बदल करण्यासाठी वेळ लागणार आहे, याचा विचार करून आम्ही संप मागे घेतो, असे संघटनेच्यावीतने जाहीर करण्यात आले.
श्रावण हर्डीकर यांची बदली मुद्रांक शुल्क विभागाचे नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रक श्रावण हर्डीकर यांची सोमवारी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी हिरालाल सोनावणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियमित बदली असल्याचे मंत्रालयातून सांगण्यात आले असले तरी मुद्रांक विक्रीबाबत घेतलेल्या वादग्रस्त निर्णयामुळे ही बदली झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.