मुंबई : दोन दिवसांपूर्वी अंधेरी (पश्चिम) परिसरात एअरगनची गोळी लागून एक भटका कुत्रा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्याच्या शरीरातील गोळी अद्याप काढण्यात आलेली नाही. कुत्र्यावरील शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार असून तितका निधी उपलब्ध होऊ न शकल्याचे शस्त्रक्रिया रखडली आहे. अंधेरी (पश्चिम) येथील शांतिवन या गृहनिर्माण सोसायटीत दोन दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याला एअरगनची गोळी लागली होती. याप्रकरणी ओशिवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदर भटक्या कुत्र्यावर सध्या प्राण्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्याच्या शरीरातील गोळी अद्याप काढण्यात आलेली नाही. गोळी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी मोठा खर्च येणार आहे.
दरम्यान, परिसरातील काही तरुणांनी निधी गोळा केला असून त्या रकमेतून सध्या कुत्र्यावर उपचार करण्यात येत आहेत. कुत्र्याला एअरगनची गोळी लागली त्याच दिवशी या मुलांनी घटनेची माहिती पोलीसांना दिली आणि कुत्र्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी या मुलांनी १५ हजार रुपये गोळा केले होते. त्यानंतर सोमवारी एका प्राणीप्रेमीने १५ हजार रुपयांची मदत केली. मात्र,श्स्त्रक्रियेसाठी मोठा खर्च असून तितका निधी उपलब्ध नाही. त्यामुळे कुत्र्यावर शस्त्रक्रिया करता आलेली नाही.
हेही वाचा…दीड कोटींच्या हिरे चोरीप्रकरणी आरोपीला अटक, ९७ टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात यश
कुत्रा दाखल असलेल्या रुग्णालयात जीवन सुरक्षा प्रणाली (व्हेंटिलेटर) उपलब्ध नाही. त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी त्याला अन्य रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. शस्त्रक्रियेबाबत डॉक्टरांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्यास कुत्र्याला एक महिना रुग्णालयाऐवजी देखभाल केंद्रात ठेवण्यात येईल, अशी माहिती धवल शहा यांनी दिली. दरम्यान, भटका कुत्रा सतत भुंकत असल्यामुळे त्याला एअरगनने गोळी मारण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कांदिवली परिसरात एका नाल्यात ५ भटक्या कुत्र्यांचे मृतदेह गोणीत भरून फेकण्यात आले होते.