मुंबई : या आठवड्यातही उपनगरातील किमान तापमानातील घट कायम असून, मंगळवारी सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १७ अंशाखाली नोंदले गेले. तेथे १६.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईत उपनगरांत किमान तापमानात अधूनमधून घट होत आहे. उपनगरांत मागील तीन- चार दिवसांपासून किमान तापमान १८ ते २० अंशादरम्याम नोंदले जात आहे. त्यामध्ये मंगळवारी आणखी घट होऊन सांताक्रूझ केंद्रावर १६.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. नोव्हेंबर महिन्यात प्रथमच किमान तापमान १७ अंशाखाली गेले आहे. पुढील काही दिवस यामध्ये फार मोठा बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने सांगितले. सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमानात घट झाली असली तरी कुलाबा केंद्रावर किमान तापमान स्थिर आहे. कुलाबा येथे मंगळवारी २२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईच्या कमाल तापमानात सध्या चढ-उतार सुरू असून काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा : बालकावरील उपचाराच्या नावाखाली साडेचार कोटींची फसवणूक, माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवरून नागरिकांना मदतीचे आवाहन

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यात प्रवेश करताना ताशी २५ ते ३० किमी वेगाने वाहणाऱ्या पूर्वीय वाऱ्यांसोबत येत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यातील किमान तापमानात आणखी घट झाली आहे. दरम्यान, मुंबईतील किमान तापमान पुढील दोन – तीन दिवस १६ ते १७ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.